देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका; पंजाब, दिल्ली, केरळात वाढली रुग्णसंख्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे.

नवी दिल्ली : देशात आजपासून अनलॉक-5 ला सुरवात झालीय. यानुसार आता चित्रपट थिएटर सुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. मात्र, केरळ आणि पंजाबमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे चिंता वाढली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. शिवाय यामुळे येणाऱ्या दसरा-दिवाळी या सणसंमारंभाच्या काळात अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दिल्ली, पंजाब आणि केरळमध्ये रुग्णसंख्या वाढती
राजधानी दिल्ली आणि केरळमध्ये कोविड-19 च्या नव्या केसेसची संख्या वाढत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाची पहिली मोठी लाट जून महिन्यात आली होती जेव्हा दररोज सरासरी 3 हजार नवे रुग्ण सापडत होते. जुलैच्या सुरवातीला आणि शेवटाला दररोज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरवात झाली. या दरम्यान दिल्लीत दररोज एक हजारच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. 

हेही वाचा - हाथरस - पीडितेचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; धक्कादायक खुलासा
ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीमध्ये सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही हळूहळू वाढू लागली. 9 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत 4,039 नवे रुग्ण सापडले होते.  राज्य सरकारच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढून 2.5 लाखाच्या पार गेली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये 3,827 नवे रुग्ण सापडले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, दिल्ली, पंजाब आणि केरळ या राज्यांमध्ये दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. 

या प्रकारेच केरळमध्येही कोरोना प्रादूर्भाव दिवसागणिक वाढतच असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी रुग्ण आढळून आले होते. मात्र 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच 23 ते 29 सप्टेंबरच्या आठवड्यात राज्यात 5,898 नवीन रुग्ण सापडले आहेत. 

हेही वाचा - बेरोजगारीमुळेही बलात्कार घडतात; माजी न्यायाधीश काटजूंच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण

या राज्यात संख्या घटली
या साऱ्या घडामोडी दरम्यान चांगली बातमी ही आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वांत मोठा फटका बसलेल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच इतरही काही राज्यात कोरोनाचे आकडे हे कमी येत असल्याचे दिसून आले आहे. 

येणारे महिने महत्वपूर्ण
तज्ञांच्या म्हणण्यानुसार येणारे काही महिने हे महत्वपूर्ण असणार आहेत. कारण देशात नवरात्र, छठ पूजा, दसरा, दिवाळी सारखे महत्वाचे सण येणार आहेत. या साऱ्या सणांदरम्यान आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचं पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surge in corona cases punjab delhi keral second wave of covid