स्वामी विवेकानंदाच्या प्रश्नांनी गोरक्षकाची बोलती झाली होती बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 12 January 2021

स्वामी विवेकानंद आणि गोरक्षा प्रचारक संन्यासी यांच्यामध्ये झालेली चर्चा ही खूप महत्त्वाची आहे.

ही घटना आहे फेब्रुवारी 1897 ची . स्वामी विवेकांनद रामकृष्ण परमहंस यांच्या एका भक्ताच्या घरी आले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत असत. यावेळी अनेक विषयांवर चर्चाही होत असे. यावेळी एक गोरक्षा प्रचारक त्याठिकाणी आले. स्वामी विवेकानंद आणि गोरक्षा प्रचारक संन्यासी यांच्यामध्ये झालेली चर्चा ही खूप महत्त्वाची आहे. हे संभाषण शरतचंद्र चक्रवर्ती यांनी बंगाली भाषेत नमूद करुन ठेवलंय. यावरुन स्वामी विवेकानंद यांचे गोरक्षासंबंधी काय विचार होते हे आपल्याला कळून येतील.  

स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली अमेरिकेच्या शिकागोमध्ये विश्व धर्म महासभेमध्ये हिंदू धर्माची पताका फडकावली होती. त्याच विवेकानंदांनी गोरक्षकाला जे म्हटलं त्याची कल्पना करणे सोपं नाही. गोरक्षकाने साधु-संन्याशासारखेच कपडे घातलेले. अभिवादन म्हणून त्याने गायची फोटो विवेकानंदाना दिली. त्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा सुरु झाली. 

विवेकानंद विचारतात, तुमच्या सभेचा काय उद्देश आहे?

यावर प्रचारक म्हणतो, आम्ही गोमातेला कसायांच्या हातून वाचवतो, आम्ही ठिकठिकाणी गोशाळा स्थापन केल्यात. आम्ही आजारी, कमजोर आणि कसायांना विकल्या गेलेल्या गायींचे पालन करतो.

विवेकांनद म्हणतात, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या सर्वांच्या उत्पन्नांचा काय स्रोत आहे?

मारवाडी वैश्य लोक आम्हाला विशेष मदत करतात. त्यांनी या सत्कार्यासाठी खूप मदत केली आहे, असं उत्तर प्रचारकाकडून येतं.

मध्य भारतात यावेळी दुष्काळ पडलाय, भारत सरकारने सांगितलंय की 9 लाख लोक अन्न न मिळाल्याने मेले आहेत. तुम्ही सर्व लोक अशा भीषण दुष्काळात मदतीसाठी काही कार्य करत आहात का?, असा प्रतिप्रश्न विवेकानंद प्रचारकाला करतात.

आम्ही दुष्काळामध्ये काही मदत करत नाही. ही सभा केवळ गोमातेच्या रक्षणासाठी सुरु करण्यात आली आहे, असं प्रचारक म्हणतो. 

विवेकानंदांचा यावर प्रश्न येतो की, तुमच्या नजरेसमोर पाहता-पाहता लाखो लोक मरत आहेत. तुमच्याकडे पैसे आहेत, पण किमान मुठभर धान्य देऊन या भयानक दुष्काळात लोकांची मदत करणं तुमचं कर्तव्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का?

विवेकानंद यांच्या या प्रश्नावर प्रचारक थोडावेळ गडबडतो आणि म्हणतो, ते लोकांच्या पापाचं फळ आहे, पापामुळेच दुष्काळ पडतो, जसं कर्म असेल तर फळ लोकांना मिळत असतं. या उत्तराने स्वामी विवेकानंद संतापतात. त्यांचा चेहरा रागाने लाल होतो. पण आपल्या भावनांवर ताबा ठेवत ते म्हणतात, ज्या सभा-समिती मानसासोबत सहानुभूती ठेवत नाहीत, आपल्या बंधूंचा भुकेमूळे जाणारा प्राण पाहूनही ज्यांना प्राण्यांना अन्न-धान्य देणं महत्त्वाची वाटतं. जे आपल्यासारख्या मानसांना मुठभर अन्न देऊ शकत नाही, अशा सभा-समितीसोबत माझी किंचितही सहानुभूती नाही. अशा लोकांमुळे समाजाचे कल्याण होईल, असं मला वाटत नाही.

चांगल्या-वाईट कर्माबाबत बोलताना विवेकानंद म्हणतात, आपल्या कर्मामुळे लोक मरत आहेत, असा तर्क वापरने तर हास्यास्पद आहे. पशु-पक्षांसाठी तुमचे कामही याच अंतर्गत येते. तुम्ही जे काम करता त्याबाबतही असं म्हटलं जाऊ शकतं. गोमाता आपल्या कर्म फळामुळेच कसायांच्या हातात जातात आणि मारल्या जातात. त्यामुळे त्यांच्या रक्षेचे प्रयत्न करणेही विनाकारण आहे. 

13 शहरांमध्ये झाली लशीची डिलिव्हरी; कोणत्या राज्याला किती डोस मिळाले?

विवेकानंदाच्या अशा प्रतिक्रियेमुळे काय बोलावं हे प्रचारकाला काहीवेळ कळालं नाही. नंतर तो म्हणाला, तुम्ही जे म्हणत आहात, ते खरं आहे, पण आपलं शास्त्र म्हणतं की गाय आपली माता आहे. 

विवेकानंद म्हणतात, मी एक संन्याची फकीर आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी आपली मदत करु शकत नाही. पण मी एक सांगतो की जर माझ्याकडे पैसे असते तरी मी ते पहिल्यांदा मानवाच्या सेवेसाठी खर्च केले असते. सर्वात आधी मानसाला वाचवलं पाहिजे, अन्नदान, विद्यादान, धर्मदान करायला हवं. हे सर्व केल्यानंतर जर माझ्याकडे काही पैसे उरले असतील तर तुमच्या समितीला नक्की देईन. 

विवेकानंद आणि गोरक्षा प्रचारकामध्ये झालेली ही चर्चा 124 वर्षांपूर्वीची आहे. पण, आजही त्यांचे विचार कथित गोरक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. आज गौरक्षेच्या नावावर अनेकांची हत्या करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचे विचार दिशादर्शक आहेत. स्वामी विवेकानंदांसाठी माणूस आणि माणूसकीची सेवा हेच सर्वात मोठे धर्म होते. त्यामुळे विवेकानंदाची आठवण काढताना त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swami vivekanand birth anniversary national youth day 12 January