esakal | कमल हसन राजकीय पडद्यावरही ठरणार का सुपरहीट?

बोलून बातमी शोधा

कमल हसन राजकीय पडद्यावरही ठरणार का सुपरहीट?

कमल हसन राजकीय पडद्यावरही ठरणार का सुपरहीट?

sakal_logo
By
विनायक होगाडे

अभिनयातून राजकीय पडद्यावर आपली अदाकारी सादर करण्यासाठी फेब्रुवारी 2018 मध्ये कमल हसन यांनी या नव्या पक्षाची स्थापना केली. 66 वर्षांच्या कमल हसन यांनी 'मक्कल निधी मय्यम' नावाचा पक्ष स्थापन केला ज्याचा अर्थ होतो 'जन न्याय केंद्र'. मदुराईमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी नव्या या पक्षाची घोषणा केली होती. एका भव्य अशा समारंभात कमल हसन यांनी आपल्या समर्थकांसमोर त्यांच्या या नव्या पक्षाचं 'व्हिजन' मांडलं होतं तेव्हा त्याठिकाणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील व्यासपीठावर उपस्थित होते. तमिळनाडू राज्याच्या या आधीच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. जयललिता आणि करुणानिधी या अनेक वर्षांपासून तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरा ठरलेल्या या दोघांची जागा घेण्यास सध्या तरी कोणी तयार नव्हतं, अशा काळात कमल हसन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

हेही वाचा: Live: कमल हसन दक्षिण कोयंबतूरमधून आघाडीवर

'टॉर्चलाईट'चा प्रकाश पडणार का?

2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा उतरुन त्यांनी सक्रिय राजकारणात आपली प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, या निवडणुकीत कमल हसन स्वत: उभे राहिले नव्हते. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीत ते स्वत: दक्षिण कोयंबतूर मतदारसंघात उभं राहिले आहेत. एमएनएमने या निवडणुकीत 142 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमल हसन यांच्या नवख्या पक्षाने राज्यातील 3.72 टक्के व्होट शेअर घेतले होते. निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला 'टॉर्चलाईट' हे निवडणूक चिन्ह देऊ केलं आहे.

कमल हसन यांची स्वतंत्र आघाडी मैदानात

2021 च्या या निवडणुकीत द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन बड्या पक्षांना टक्कर देण्यासाठी कमल हसन यांनी अनेक लहान पक्षांशी हातमिळवणी केली आहे. या युतीला त्यांनी आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी 'मक्कलीन मुधल कुटानी' (Makkalin Mudhal Kootani) असं नाव दिलं आहे. ही आघाडी तब्बल 227 जागांवर निवडणूक लढवत आहे. मक्कल निधी मय्यम या निवडणुकीत 142 जागांवर निवडणूक लढवत आहे. टी आर पारीवेंधर यांच्या नेतृत्वातील इंधीया जननयगा काटची (IJK) हा पक्ष 40 जागा लढवत आहे तर आर. सरथकुमार यांच्या नेतृत्वातील ऑल इंडिया समथुवा मक्कल काटची (AISMK) हा पक्ष 33 जागांवर निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा: Live : केरळचा कौल LDFला

कमल हसन आघाडीवर

सध्या कमल हसन आपल्या मतदारसंघात आघाडीवर आहेत. या ठिकाणी त्यांचा विजय निश्चित आहे, असं म्हटलं जातंय. कमल हसन ज्या दक्षिण कोयंबतूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तो मतदारसंघ सर्वांत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो आहे. याचं कारण असं आहे की, तमिळनाडूतील सर्वांत शक्तीशाली मानले जाणारे दोन्ही द्रविड पक्ष हे या मतदारसंघात लढत नसून त्यांचे सहकारी पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या मतदारसंघात लढत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तुलनेने कमल हसन यांना कमी टक्कर द्यावी लागणार आहे.

तमिळनाडूच्या विधानसभेतलं काय आहे बलाबल?

तमिळनाडूमध्ये 234 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. आज तब्बल 4,218 उमेदवारांचं भविष्य निश्चित होणार आहे. राज्यात सत्ता गाठण्यासाठी 118 जागांचा टप्पा गाठणे महत्त्वाचे आहे. एम करुणानिधी आणि माजी मुख्यमंत्री जयललिथा यांच्या मृत्यूनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. AIADMK आणि DMK हे या ठिकाणी लढणारे प्रमुख पक्ष आहेत. सहा एप्रिल रोजी राज्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदानात तब्बल 72.78 टक्के मतदारांनी मतदान केलं आहे. एक्झिट पोल्समध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, DMK या राज्यात मुसंडी मारणार असल्याचं चित्र आहे. एम के स्टालिन आणि त्यांचे सहकारी पक्ष या ठिकाणी या निवडणुकीत बाजी मारतील, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी मांडला आहे. डीएमकेला या ठिकाणी 160 जागा मिळतील तर एआयडीएमकेला याठिकाणी 66 जागा मिळतील असा अंदाज आहे.

हेही वाचा: Live: दुसऱ्या फेरीत ममतांना धक्का; सुवेंदू 3,400 मतांनी आघाडीवर