तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 12 जणांचा मृत्यू

टीम ई सकाळ
Friday, 12 February 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, तामिळनाडूतील विरुधुनगरमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात लागलेली आगीची घटना दुर्दैवी आहे.

चेन्नई - तामिळनाडूतील एका फटाक्याच्या कारखान्यात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानं कारखान्यात स्फोट झाले आणि यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकेललं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फटाके तयार करण्यासाठी केमिकल मिसळलं जात असताना आग लागली.

घटनास्थळावर सहा पेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र फटाक्यांसाठीचा दारुगोळा असल्यानं कारखान्यात लागोपाठ स्फोट होत आहेत. आगीमुळे 36 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. 

दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर बराच काळ स्फोट होत होते. यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. सत्तुर, शिवाकाशी, वेम्बकोट्टइच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगीमध्ये जवळपास फटाके तायर करणारी चार शेड जळून खाक झाली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, तामिळनाडूतील विरुधुनगरमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात लागलेली आगीची घटना दुर्दैवी आहे. या घटनेत पीडित कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील. या घटनेत हानी पोहोचलेल्या लोकांना मदतीसाठी प्रशासन काम करत आहे. 

हे वाचा - भाजपशासित या राज्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात केली 5 रुपयांची कपात, दारुही स्वस्त

हे वाचा - हेलिकॉप्टरसाठी राष्ट्रपतींकडून हवंय कर्ज; महिलेच्या मागणीने गाव अचंबित

तामिळनाडूत शिवाकाशी हे देशातलं सर्वात मोठं फटाके निर्मिती होणारं ठिकाण आहे. इथं जवळपास प्रत्येक घरात फटाक्यांची निर्मिती होते. शिवाकाशीमध्ये हजारांहून अधिक कारखाने असून वर्षाला इथल्या फटाके व्यवसायाची उलाढाल ही 3 हजार कोटी रुपयांपर्यंत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu Fire breaks out firecracker factory 6 dead