कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून तीन भाजप कार्यकर्त्यांची हत्या; PM मोदींनी नोंदवला निषेध

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करुन या घटनेची निंदा केली आहे.

कुलगाम : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगामच्या एका गावात दहशतवाद्यांकडून तीन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केल्याची घटना काल समोर आली आहे. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटलंय की, आज जवळपास 8 वाजून 20 मिनिटांनी कुलगाम पोलिसांना पोरा गावांत एक दहशतवादी घटना घडल्याची माहिती मिळाली. यामध्ये दहशतवाद्यांनी तीन भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. उपचारासाठी या तिघांना जवळच्या एका दवाखान्यात नेलं गेलं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

हेही वाचा - बलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करुन या घटनेची निंदा केली आहे. मी तीन कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करतो. जम्मू काश्मीरमध्ये उत्कृष्ट काम करणारे ते तीघेही प्रतिभावान कार्यकर्ते होते. अशा दु:खाच्या समयी मी त्यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या आत्म्याला चिर:शांती लाभो. 

पोलिसांनी म्हटलं की, प्रथमदर्शनी तपासात असं माहिती झालंय की दहशतवाद्यांनी तीन भाजपा कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. भाजपाच्या जिल्हा महासचिव फिदा हुसैन यातू, कार्यकर्ता उमर राशिद आणि उमर रमजान हाजम अशी या तीन भाजपच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. हे पुरा गावचे निवासी होते. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - भाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड?

नॅशनल कॉन्फरंसचे नेता उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून एक भयावह बातमी मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्यात तीन भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये जागा देईल आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या परिवाराला ताकद मिळो. 

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही या घटनेबाबत आपल्या ट्विटरवरुन लिहलं आहे की, कुलगाममधील भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या हत्येबाबतीत ऐकून खूप दु:ख झालं. त्यांच्या कुंटुंबाप्रती संवेदना आहेत. सरतेशेवटी, भारत सरकारच्या रोगट धोरणांमुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांनाच आपले प्राण गमवावे लागतात असंही त्यांनी म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terrorist killed 3 bjp workers in J&K modi condemns the brutal incident