‘दिल्लीत हिंदुत्वाचा पराभव नाही’

Mohan-Bhagwat
Mohan-Bhagwat

नवी दिल्ली - दिल्लीत झालेला भाजपचा पराभव हा हिंदुत्वाचा पराभव नाही, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज व्यक्त केले. सरकारे येतील आणि जातील. पण, विचारसरणीचा पाया भक्कम करून चारित्र्यवान हिंदू समाजाची निर्मिती करणे, हे अव्याहत चालणारे कार्य आहे, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या सरसंघचालकांनी आज देशातील निवडक ७० स्तंभलेखकांशी संवाद साधला. छत्तरपूरच्या देवी तेरापंथ भवनात हा कार्यक्रम झाला. यात महाराष्ट्रासह देशभरातील स्तंभलेखक हजर होते. या कार्यक्रमासाठी पत्रकारांना बंदी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे व स्थानिक नेते यांना प्राधान्य न देता हिंदुत्व, शाहीनबाग, भारत-पाकिस्तान हे मुद्दे उगाळले. मात्र, भाजपचा प्रचार व त्याचा पराभव, हा हिंदुत्वाचा मानताच येणार नाही, असे निरीक्षण डॉ. भागवत यांनी दिल्लीचा नामोल्लेख टाळून नोंदविले. 

ते म्हणाले, ‘‘हिंदुत्व ही आध्यात्मिक प्रकृतीची व हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली संकल्पना आहे. आम्ही हिंदू म्हणून जे आहोत ते चांगले आहोत. जे स्वार्थीपणाने आमच्यात येतील त्यांच्यापासून सावध राहणेही आवश्‍यक आहे. हिंदुत्वाचे ‘संस्थाकरण’ करणे किंवा विरोधकांना संपविणे, याची गरज नाही. संघ कायमच व्यक्तिनिर्माणावर विश्‍वास ठेवून त्यासाठीच कायम कार्यरत आहे.’’

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा-सीएएला होणाऱ्या विरोधाबाबत सरसंघचालक म्हणाले, ‘‘हा कायदा भले तुम्हाला आवडलेला नसो; पण त्याविरोधातील आंदोलनांत बस जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, हे तुम्ही करू शकत नाही. विरोधाची ही पद्धत म्हणजे लोकशाही नव्हे. मात्र, आता ‘ते’ भारतीय राष्ट्रध्वज व राज्यघटना घेऊन ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत आहेत. तेव्हा कोणाचा विजय होत आहे, हेही उघड आहे.’’

गेले सहा महिने काश्‍मिरी जनता अस्वस्थ असल्याचे वृत्त येत आहे. या पार्श्‍वभूमीवर भागवत म्हणाले की, काश्‍मिरातून हिंदूंना हाकलून दिल्यानंतर जन्माला आलेल्या पिढीने हिंदू म्हणजे काय किंवा हे धर्मीय कसे असतात, हे पाहिलेदेखील नाही. आता त्या केंद्रशासित प्रदेशात परतणारे हिंदू या पिढीला सहिष्णू हिंदुधर्म व हिंदुधर्मीय कसे असतात, हे दाखवतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com