Up Election 2022 : तिकीट वाटपाची सूत्रे पंतप्रधानांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi
तिकीट वाटपाची सूत्रे पंतप्रधानांकडे

Up Election 2022 : तिकीट वाटपाची सूत्रे पंतप्रधानांकडे

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या(BJP) केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत प्रदीर्घ मंथन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM narendra modi) हे स्वतः या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला लागलेली गळती वाढत चाललेली पाहून तिकीट वाटपाची सूत्रे पंतप्रधानांनी हाती घेतली आहेत, हे याचेच हे द्योतक आहे. आतापावेतो उत्तर प्रदेशातील तीन मंत्री व १४ आमदारांनी भाजपला रामराम ठोकला असून ही यादी वाढत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील १७२ जागांवर बैठकीत चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य(deputy cm keshavprsad mourya) यांनी सांगितले.

हेही वाचा: 'जोरदार धडक झाली, मोठ्ठा आवाज आला...'; बिकानेर रेल्वे दुर्घटनेचा थरार

अडचणीच्या वेळी असणारी नेहमीची मौनाची भूमिका भाजपच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांनी सध्या घेतली तरी पडद्याआड वेगवान घडामोडी सुरू आहेत. गृहमंत्री अमित शहा(home minister amit shah) यांनी गेले दोन दिवस रात्रीचा दिवस करून उत्तर प्रदेशात असे का घडत आहे याची खडानखडा माहिती घेतल्याचे समजते. सीईसीच्या बैठकीत शहा, प्रभारी धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, दिनेश शर्मा व केशवप्रसाद मौर्य हे दोन्ही उपमुख्यमंत्री आदी नेतेही बैठकीत सहभागी झाले आहेत. भाजपाध्यक्ष जे पी नड्डांसह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हे डिजिटल माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. सध्याच्या वातावरणात भाजपने ४०३ पैकी प्रत्येक जागेवरील उमेदवार अत्यंत बारकाईने निवडण्याची भूमिका घेतली आहे. अंतिमतः मुद्दा २०२४ मध्ये देशाची सत्ता राखण्याचा असल्याने यापुढे योगी आदित्यनाथ यांचा शब्द दिल्लीत आता अंतिम मानला जाणार नाही, हेही स्पष्ट झाले आहे. ‘यूपी प्लस योगी -बहोत है उपयोगी’ या पंतप्रधानांच्या घोषणेतील फोलपणा १४ आमदार व ३ मंत्र्यांनीच दाखवून दिला, असे पक्षनेतृत्वाच्या लक्षात आले आहे.

सहकारी पक्षाचा दबाव

भाजपमधील (Bjp)गळती पाहून सहकारी पक्षांनीही दबाव वाढवायला सुरवात केली आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या ‘अपना दल’ने(apna dal) भाजपकडे २० जागा मागितल्या असून निषाद पक्षाचे संजय निषाद यांनीही वाढीव जागांसाठी आग्रह धरला आहे. या स्थितीत भाजपला ३८० ते ३८५ जागाच एकट्याने लढविता येतील, अशी स्थिती आहे. या जागांसाठी कमीत कमी ४००० पेक्षा जास्त इच्छुक असल्याने पक्ष नेतृत्वापुढील पेच वाढला आहे. योगी यांनी अयोध्येतून निवडणूक लढविण्यावरही आज चर्चा झाल्याचे समजते. तरी याचाही आता अंतिम निर्णय पक्षनेतृत्वच घेणार आहे. गेले दोन दिवस शहा(amit shah) यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये जी चर्चा झाली त्याचाच पुढचा अध्याय आजच्या बैठकीत चर्चिला गेला. सहकारी पक्षांनी साथ सोडू नये यासाठी किती लवचिकपणा दाखवावा यावरही आज चर्चा झाली.संक्रांतीनंतर पक्षाच्या उत्तर प्रदेशातील उमेदवारांची पहिली ‘मोठी‘ यादी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कुणाच्या भाकरीवर टाच आणाल तर..; किरण मानेंसाठी आव्हाड मैदानात

नैराश्यापोटी पक्ष सोडल्याचा अंदाज

उत्तर प्रदेशासह(uttar pradesh election ) अन्य ठिकाणी मुस्लिम मतदाराला भाजप गृहीत धरतच नाही व राज्यातील मागास जातींमध्ये ही धगधग समोर आली असेल तर भाजपसाठी ते फारच मोठे नुकसान ठरेल, असेही जाणकार मानतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मौर्य यांच्यासह भाजप सोडून जाणाऱ्यांत मागासवर्गीय आमदारांची बहुसंख्या आहे. राजकारण, मुलाबाळांनाही भाजपची तिकिटे मिळणे व राजकीय स्वार्थाच्या पलीकडेही याचा एक अर्थ लावला जाऊ शकतो. तो म्हणजे सत्तेच्या आशेने भाजपकडे आलेल्या या आमदारांना भाजपची ‘मूळ' विचारसरणी हा पक्ष कधीही सोडत नसल्याचे लक्षात आले व निराशाग्रस्त होऊन त्यांनी पक्ष सोडला असावा, अशीही यात दाट शक्यता दिसते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top