esakal | जय श्रीराम घोषणेविरोधात ममतांचा निंदा प्रस्ताव? काँग्रेस, सीपीएमचा पाठिंबा नाही
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banarjee

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी जय श्रीराम घोषणा दिल्यानं ममता बॅनर्जी भडकल्या होत्या.

जय श्रीराम घोषणेविरोधात ममतांचा निंदा प्रस्ताव? काँग्रेस, सीपीएमचा पाठिंबा नाही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी जय श्रीराम घोषणा दिल्यानं ममता बॅनर्जी भडकल्या होत्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभेत या घटनेविरोधात निंदा प्रस्ताव आणणार असल्याचं म्हटलं आहे. टीएमसीने या घोषणाबाजीला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ममता बॅनर्जी यांचा अपमान असल्याचं म्हटलं होतं. तसंच विधानसभेत निंदा प्रस्ताव मांडू असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. 

दरम्यान, जय श्रीराम घोषणाबाजीच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी नोंदवलेल्या आक्षेपाचं काँग्रेस आणि सीपीएमने समर्थन केलं होतं. मात्र आता निंदा प्रस्तावाचे मात्र समर्थन करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी काँग्रेस आणि सीपीएमने म्हटलं की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जय श्रीराम घोषणा देण्यात आल्या होत्या. या विरोधात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या निंदा प्रस्तावाचे समर्थन आम्ही करणार नाही. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं की, जर हा प्रस्ताव आणला गेला तर दोन्ही पक्ष त्याचं समर्थन करणार नाहीत. 

हे वाचा - Parliament canteen: संसदेत जेवणाचे दर वाढले; 60 रुपयांची व्हेज थाळी आता 100 ला

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान, जय श्रीराम अशी घोषणाबाजी झाली होती. कार्यक्रमाला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. तेव्हा व्यासपीठावर ममता बॅनर्जी यांनी या घोषणाबाजीचा विरोध करताना म्हटलं होतं की, एखाद्याला आमंत्रित करून असा अपमान करणं योग्य नाही. 

हे वाचा - 'ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचाराला अमित शहाच जबाबदार; गृहमंत्र्यांना बडतर्फ करा'

पश्चिम बंगालच्या विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बुधवारी सुरु झालं. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव मंजुर करण्यासाचा आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून टीएमसीकडून जय श्रीराम अशा घोषणाबाजीबद्दल निंदा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.