नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षित असा नवा ट्वीस्ट समोर आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका आणि सिन्नर नगरपरिषदेचे थेट नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले हेमंत वाजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. हेमंत वाजे यांनी नगराध्यक्ष आणि गटनेता अशी महत्त्वाची पदे भूषवली असून त्यांचा प्रभाव सर्वपरिचित आहे. हेमंत वाजे यांना गळाला लावण्यात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. या हालचालीमुळे एका फटक्यात ठाकरेंची शिवसेना आणि मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी यांना दणका बसला असून, राष्ट्रवादीकडे थेट नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ उमेदवार नसल्याने माणिकराव कोकाटे यांच्या गोटातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.