लाल किल्ल्यावर फडकवलेला झेंडा 'निशाण साहीब' बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

delhi tractor parade flag hoisted shikh
delhi tractor parade flag hoisted shikh

नवी दिल्ली - केंद्राने लागू केलेले कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्यानं ते मागे घ्यावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या काळात शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये तब्बल 11 बैठका होऊनही यावर तोडगा निघालेला नाही. अखेर शेतकरी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत घुसले आहेत. यावेळी आक्रमक झालेले शेतकरी ज्या ठिकाणी रॅलीला परवानगी दिली नव्हती अशा भागात ट्रॅक्टर घेऊन घुसले.

दिल्लीतील लाल किल्ल्यावरही आक्रमक झालेले शेतकरी पोहोचले होते. यावेळी लाल किल्ल्याच्या घुमटावर त्यांनी शीख झेंडे फडकले. दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशा मार्गावर ट्रॅक्टर रॅली गेल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी ट्रॅक्टरचालकांकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचे प्रकारही घडले. त्यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये खलिस्तानी झेंडा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. खलिस्तानींचा झेंडा फडकावण्याचा प्रयत्न झाल्यानं हा काळा दिवस असल्याचंही काहींनी सोशल मीडियावर म्हटलं. तो शिखांचा झेंडा असूनही काहींनी खलिस्तानी झेंडा असल्याचा दावा केला आहे. यामाध्यमातून पुन्हा खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही काहींनी केला.

लाल किल्ल्यावर फडकलेला झेंडा 'निशाण साहेब'
आंदोलकांनी शेतकरी आंदोलकांच्या झेंड्यासोबत एक भगव्या रंगात असलेला झेंडा फडकवला आहे. त्यावर खंडा हे चिन्ह असून या चिन्हासह असलेल्या झेंड्याला 'निशाण साहेब' असं म्हटलं जातं. संत सिपाही संकल्पनेनुसार खंडा हे चिन्ह तयार करण्यात आलं आहे. खंडा चिन्हामध्ये दुधारी तलवार, चक्र आणि दोन कृपाण यांचा समावेश आहे. प्रत्येक गुरुद्वाराच्या बाहेर हा झेंडा बघायला मिळतो. 

खलिस्तानी झेंडा फडकावल्यास अडीच लाख डॉलर
दोन आठवड्यांपूर्वी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसने घोषणा केली होती की जो कोणी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावेल त्याला अडीच लाख डॉलर बक्षीस दिली जाईल. या घोषणेनंतर आता लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा खलिस्तानी असल्याचा दावा केला जात आहे. त्यासोबत जुने ट्विट व्हायरल केले जात आहे.

कोण आहेत खलिस्तानी
शिखांच्या स्वतंत्र राज्याची मागणी 1970 च्या दशकात झाली. 1971 मध्ये गजीत सिंह चौहान यांनी अमेरिकेत जाऊन तिथं स्वतंत्र खलिस्तानची वेगळी जाहिरात दिली होती. त्यानंतर या आंदोलनासाठी निधी गोळा केला होता. पुढे 1980 मध्ये खलिस्तान राष्ट्रीय परिषद स्थापन करून ते प्रमुख बनले. लंडनमध्ये त्यांनी खलिस्तान देशाचे टपाल तिकिटही काढले होते. त्याआधी 1978 मध्ये त्यांनी एक संकल्प पत्र प्रसिद्ध केलं जे स्वतंत्र खलिस्तानबाबत होतं. 

आंदोलनात खलिस्तानी असल्याचं केंद्राचं म्हणणं
खलिस्तानींकडून आंदोलनात अडथळा आणण्याचे प्रयत्न झाल्याचं आणि त्यांचा अजेंडा रेटण्यासाठी हालचाली झाल्याचा दावाही सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला होता. यावर न्यायालयाने म्हटलं होतं की, जर बंदी घातलेली संस्था यात सहभागी होतेय असा आरोप सर्वोच्च न्यायालययात केला जात असताना याची खात्री करावी लागेल. त्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com