श्रीलंका बॉम्बस्फोट प्रकरणाचे केरळ कनेक्शन; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

एनआयएने रविवारी (ता. 28) केरळमध्ये तीन ठिकाणी छापेमारी केली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांवर आयसीसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब बॉम्बस्फोटाचं कनेक्शन आता भारतात असल्याचे समोर आले आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) केरळमधून दोन तरूणांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. 

अबू बाकर सिद्दकी आणि अहमद अराफथ अशी त्या तरूणांची नावे आहेत. दोघांकडून मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. सध्या एआयएनच्या मुख्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, केरळमधील कासरगोड जिल्ह्यातून राष्ट्रीय सुरक्षा पथकाने रविवारी या दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांचा संबंध श्रीलंका बॉम्बस्फोटातील सुत्रधार जहरान हाशीम याच्याशी असल्याचे वृत्त आहे. कासरगोडमधून अनेक तरूण अफगाणिस्थानातच दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. 

एनआयएने रविवारी (ता. 28) केरळमध्ये तीन ठिकाणी छापेमारी केली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांवर आयसीसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. 2016 मधील आयसीसी कसारगोड मॉड्युल केससाठी एनआयएने छापेमारी केली होती. 

रॉयटर्सच्या माहितीनुसार, श्रीलंकेत शुक्रवारी झालेल्या चकमकीत 15 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये बॉम्बस्फोटातील सुत्रधाराचे वडिल आणि दोन भावांचाही मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी झालेल्या चकमकीत जेनी हाशीम, रिलवान हाशीम आणि सुत्रधाराचे वडिल मोहम्मद हाशीम यांना शुक्रवारी पूर्व भागात झालेल्या चकमकीत मारले. या तिघांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात येथील स्थानिकांविरोधात ते बोलत होते. हे तिघे दहशतवाद्यांना प्रेरणा देत असल्याचेही यात दिसत होते.

गेल्या रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तीन चर्च व तीन हॉटेलमध्ये ईस्टर संडेला झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये 359 जणांनी प्राण गमावले तर पाचशेच्या पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. दहशतवादी सुशिक्षित होते, चांगल्या आर्थिक स्थितीतील होते व त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध होते असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या बॉम्ब स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Young Boys Detained From Kerala By NIA in the case of Bomb Blast in Sri Lanka