esakal | महाराष्ट्रासह देशात 24 फेक विद्यापीठे; युजीसीने जाहीर केली यादी
sakal

बोलून बातमी शोधा

UGC

 देशात सध्या 24 स्वायत्त आणि मान्यता नसलेल्या संस्था आहेत. या संस्था युजीसीच्या कायद्याच्या विरोधात चालवल्या जात असून त्यांना फेक विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात येत असल्याची माहिती युजीसीकडून देण्यात आली.

महाराष्ट्रासह देशात 24 फेक विद्यापीठे; युजीसीने जाहीर केली यादी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) बुधवारी देशातील एकूण 24 विद्यापीठांना बनावट घोषित केलं आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील विद्यापीठांचा समावेश असून महाराष्ट्रातील एक विद्यापीठ या यादीत आहे. देशातील 24 स्वायत्त आणि मान्यता प्राप्त नसलेल्या संस्था या यादीमध्ये आहेत. 

युजीसीचे सचिव रजनीश जैन म्हणाले की, विद्यार्थी आणि लोकांना माहिती देण्यात येत असून देशात सध्या 24 स्वायत्त आणि मान्यता नसलेल्या संस्था आहेत. या संस्था युजीसीच्या कायद्याच्या विरोधात चालवल्या जात असून त्यांना फेक विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात येत आहे. या विद्यापीठांना पदवी देण्याचा अधिकार नसल्याचंही युजीसीने नमूद केलं आहे. युजीसी अधिनियम 1956 नुसार फक्त तीच विद्यापीठे पदवी देऊ शकतात ज्यांना केंद्र, राज्य आणि प्रदेशांच्या कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलं आहे किंवा अशा संस्था ज्या संसदेनं कायदा तयार करून पदवी देण्यासाठी अधिकृत केल्या आहेत. 

हे वाचा - जेईई ऍडव्हान्स पुन्हा होण्याची शक्‍यता; आयआयटी प्रवेशाची तिसरी संधी?

उत्तर प्रदेशात सर्वाधिक फेक विद्यापीठे
वाराणसी संस्कृत विद्यापीठ (वाराणसी), महिला ग्राम विद्यापीठ (प्रयागराज), गांधी हिंदी विद्यपीठ (प्रयागराज), नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉप्लेक्स होमिओपॅथी (कानपुर), नेताजी सुभाष चंद्र बोस ओपन यूनिवर्सिटी (अलीगढ), उत्तरप्रदेश विद्यापीठ (मथुरा), महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ (प्रतापगढ) आणि इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद् (नोएडा) ही उत्तर प्रदेशातील फेक विद्यापीठांच्या यादीत आहेत.

दिल्लीतील 7 विद्यापीठांचा समावेश
दिल्लीमध्ये जवळपास 7 फेक विद्यापीठे असल्याचं युजीसीने म्हटलं आहे. यामध्ये कमर्शियल यूनिवर्सिटी लिमिटेड, यूनाइटेड नेशन्स यूनिवर्सिटी, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड इंजीनिअरिंग, विश्वकर्मा ओपन यूनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि अध्यात्मिक विद्यापीठ या विद्यापीठांना फेक म्हणून घोषित केलं आहे. 

हे वाचा - खुशखबर : भारतीयांनी शोधला कोरोनावरील उपचार; ट्रायलला मिळाली परवानगी

ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठांना फेक विद्यापीठांच्या यादीत टाकण्यात आलं आहे. यामध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन (कोलकाता), इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च (कोलकाता), नवभारत शिक्षा परिषद (राउरकेला) आणि नॉर्थ ओडिशा यूनिवर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

देशातील एकूण 24 फेक विद्यापीठांपैकी कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुद्दुचेरी या राज्यांमध्ये प्रत्येक एका विद्यापीठाचा फेक विद्यापीठांच्या यादीत समावेश आहे. यामध्ये श्री बोधि अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (पुद्दुचेरी), क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड यूनिव्हर्सिटी (आंध्रप्रदेश), राजा अरबिक यूनिव्हर्सिटी (नागपूर), सेंट जॉन यूनिव्हर्सिटी (केरल) आणि बादगनवी सरकार वर्ल्ड ओपन यूनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी (कर्नाटक) या विद्यापीठांचा समावेश आहे.