एव्हरेस्ट आणि हवामान बदलाचे आव्हान

एव्हरेस्ट चढाईचा नेमका मोसम कुठला, कधी हवामान चांगले असते इत्यादींचा अभ्यास हवामान अभ्यासक गेली अनेक वर्षांपासून करत आहेत.
Mount Everest
Mount EverestSakal

माऊंट एव्हरेस्टया नावातच एक वलय आहे. जिथे वलय असते तिथे आव्हानेही तेवढीच असतात. एव्हरेस्ट चढाई करणे, म्हणजे सर्वार्थाने आव्हानात्मक. वर्षातील कोणत्याही दिवशी, मनात आले तेव्हा एव्हरेस्ट किंवा इतर अतिउंच शिखरांवर चढाई करता येत नाही. त्यासाठी हवामान अनुकूल असणे गरजेचे असते. (Umesh Zirape Wries about Mount Everest Environment Changes Challenge)

एव्हरेस्ट चढाईचा नेमका मोसम कुठला, कधी हवामान चांगले असते इत्यादींचा अभ्यास हवामान अभ्यासक गेली अनेक वर्षांपासून करत आहेत. उपलब्ध माहितीचे पृथःकरण करून, अंदाज बांधून चढाईचे दिवस ठरविले जातात. मात्र गेल्या काही वर्षांत हवामान इतके लहरी झाले आहे, की त्याचा मोहिमांवर फार मोठा परिणाम होत आहे. हवामान बदलाचा फटका एव्हरेस्टला देखील बसतो आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

‘जेट स्ट्रीम’वर मोहीम अवलंबून

  • हिमालयातील मोहिमांमध्ये विशेषतः एव्हरेस्ट सारख्या अष्टहजारी शिखर मोहिमांमध्ये शिखर चढाई ही प्रामुख्याने जेट स्ट्रीमवर अवलंबून असते.

  • या जेट स्ट्रीम किंवा जेटचा प्रवाह हा पश्‍चिमीय वाऱ्याच्या पट्ट्यात साधारणपणे समुद्रसपाटीपासून ८ ते १५ किलोमीटर उंचीवर

  • वाऱ्याचा वेग ताशी ३०० ते जास्तीत जास्त ४०० किलोमीटर इतका प्रामुख्याने असतो.

  • याची लांबी १००० ते ४००० किलोमीटर

  • रुंदी साधारणपणे १०० किलोमीटर

  • जाडी ५ किलोमीटर

इतक्‍या वेगाने व विस्तीर्ण अशा हवेच्या या पट्ट्यात मॉन्सूनच्या आगमनाने काहीसा बदल झाल्याने त्याचा फायदा हिमालयातील शिखर मोहिमांमध्ये होतो. मुख्यतः उप- उष्णकटिबंधीय जेटचा प्रवाह हिवाळ्यात हिमालयाच्या दक्षिण बाजूने वाहतो तर मे- जूनच्या सुमारास जसा मॉन्सून बंगालच्या उपसागरात प्रवेश करतो तसे जेटचे प्रवाह हिमालयाच्या उत्तरेकडे सरकतात. ते ज्यावेळेस उत्तरेकडे सरकतात, त्यावेळेस त्याचा वेग ताशी 50 किलोमीटरपेक्षा कमी होतो व याच काही दिवसांना गिर्यारोहणाच्या भाषेत हवामानाची उघडीप किंवा वेदर विंडो असे म्हणतो. सर्वच अष्टहजारी शिखर मोहिमांमध्ये ही वेदर विंडो तपासूनच कमीत कमी हवेचा वेग असलेले दिवस प्रत्यक्ष शिखर चढाईसाठी सुनिश्‍चित करणे आवश्‍यक असते.

यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात हवेचा ताशी वेग 25 किमीच्या खाली आला होता, म्हणजेच जेटचा प्रवाह हिमालयावरून गायब झाला होता. हवामानात दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे असे होते. तौक्तेचक्रीवादळाचा परिणाम म्हणून एव्हरेस्ट परिसरात 19 मे नंतर वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला. त्या पाठोपाठ आलेल्या यास वादळामुळे एव्हरेस्ट शिखरमाथ्याजवळ वाऱ्याच्या वेग 45 ते 60 किमी प्रतितास इतका होता. त्यामुळे हा लेख पूर्ण होईपर्यंत चालू असलेल्या मोहिमांत एकालाही एव्हरेस्ट शिखरमाथा गाठता आला नव्हता. तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळून हिमनदीच्या सरोवराचा आकार वाढत असून अशी सरोवरे फुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याचा थेट धोका सरोवराखालील भागामध्ये असणाऱ्या नागरी वस्त्यांना आहे.

‘डेथ झोन’ म्हणजे काय?

बदलत्या हवामानामुळे गिर्यारोहकांसमोरील एव्हरेस्टची आव्हाने वाढली आहेत. काही तासांच्या अंतराने तब्बल 40 ते 50 अंशांनी हवामानात होणारा बदल गिर्यारोहकांची शारीरिक व मानसिक परीक्षा पाहतो. गिर्यारोहकांच्या परीक्षांची परिसीमा येते आठ हजार मीटरहून उंच ठिकाणी. आठ हजार मीटर उंचीच्या वर असलेल्या परिसराला ‘डेथ झोन’असे म्हणतात. कारण इथे हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण हे केवळ 1 ते 2 टक्के एवढे कमी असते. उणे 30 ते 40 अंश सेल्सियस इतक्‍या कमी तापमानातील थंडी अक्षरशः हाडे गोठवणारी असते. नियमित होणारा हिमवर्षाव अन सोबतीला असलेले जोराचे वारे गिर्यारोहकाच्या जिवावर बेतू शकतात.

हवामानातील बदल आणि तापमानात होणारी वाढ एव्हरेस्टसारख्या जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचली आहे. याकडे तातडीने जगाचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. यासाठी व्यापक स्वरुपात संशोधन, त्याबद्दल जनसामान्यात जागृतीमध्ये करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा मोठ्या अनर्थाचे साक्षीदार होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.

चढाईचा काळ

मे- जूनच्या सुमारास जसा मान्सून बंगालच्या उपसागरात प्रवेश करतो तसे जेटचे प्रवाह हिमालयाच्या उत्तरेकडे सरकतात. ते ज्यावेळेस उत्तरेकडे सरकतात, त्यावेळेस त्याचा वेग ताशी ५० किलोमीटरपेक्षा कमी होतो व याच काही दिवसांना गिर्यारोहणाच्या भाषेत हवामानाची उघडीप किंवा ‘वेदर विंडो’ असे म्हणतो.

हे बदल जाणवले

सुरवातीच्या वर्षांमध्ये एव्हरेस्ट शिखरमाथ्याजवळ अधिकाधिक बर्फ असायचा. त्यामुळे बर्फातून वाट काढत चढाई तुलनेने सोपी होती. मात्र, शेवटच्या काही वर्षांमध्ये अगदी एव्हरेस्ट शिखरमाथ्याजवळ देखील रॉक पॅचेस दिसू लागले होते. बर्फ वितळलेला दिसू लागला होता. मला याचे शास्त्रीय कारण माहीत नाही, मात्र जशी चर्चा होते आहे त्याप्रमाणे हा तापमान वाढीचा परिणाम असावा.

- आपा शेर्पा, २१ वेळा एव्हरेस्ट सर करणारे

लहरी हवामानाचा परिणाम

  • आठ हजार मीटर उंचीच्या वर वाहणारे जेट स्ट्रीम्स यावर्षी पहिल्या टप्प्यात गायब. त्यामुळे अतिउंचीवरील वाऱ्यांसंदर्भात अनिश्‍चितता.

  • बर्फ वितळण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षात वाढ.

  • अनेक ठिकाणी ‘रॉक पॅचेस’ उघडे. चढाईच्या वेळी हिमकडे कोसळणे, हिमप्रपात होण्याचा धोका.

  • एव्हरेस्ट परिसरात इम्जा त्सो या २ किमी लांबीच्या व ६५० मीटर रुंदीच्या हिमनदी सरोवराच्या आकारमानात हिमनदीच्या वितळण्यामुळे वाढ.

  • सरोवर फुटीची आणि २७ गावे वाहून जाण्याची भीती.

  • नॅशनल जिओग्राफिक व रोलेक्‍स यांच्या संयुक्त विद्यमाने ५३०० मीटरवर स्थित बेसकॅम्प, ६४०० मीटरवर स्थित कॅम्प २, ७९०० मीटरवर स्थित साऊथ कोल, तर ८४०० मीटर स्थित बाल्कनी येथे ‘वेदर स्टेशन’ उभे करण्यात आले आहे.

  • चक्रीवादळांमुळे एव्हरेस्ट परिसरातील हवामानात अचानक बदल. यावर्षी वाऱ्याचा वेग वाढला आहे, बर्फवृष्टी वाढली आहे, तापमानात कमालीची घट होऊन कडाक्‍याची थंडी जाणवते आहे.

(लेखक हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com