आईची हाक ऐकली अन् त्यांनी ठेवली शस्त्रे

पीटीआय
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- दहशतवादी संघटनांतील 50 तरुण मुख्य प्रवाहात 

- लष्कराच्या 'चिनार कोअर'चे ऑपरेशन "मॉं' यशस्वी 

श्रीनगर : दहशतवाद्यांच्या हिंसक कारवायांसाठी कुख्यात असलेल्या काश्‍मीर खोऱ्यातील चित्र हळूहळू बदलू लागले आहे. येथील तरुणाई हिंसाचाराचा त्याग करीत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येताना दिसते. काश्‍मीरमधील भारतीय लष्कराच्या पंधराव्या कोअरच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या "मॉं' या मोहिमेंतर्गत तब्बल 50 तरुणांनी दहशतवादी संघटनांचा त्याग केल्याची आशादायी बाब उघड झाली आहे. 

लष्कराच्या पंधराव्या कोअरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल कंवलजितसिंग धिल्लॉं म्हणाले, "काश्‍मीर खोऱ्यातून बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. लष्कराची ही पंधरावी कोअर "चिनार कोअर' म्हणूनदेखील ओळखली जाते. काश्‍मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना हीच कोअर आघाडीवर असते. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांतील कारवाया रोखण्यातदेखील या कोअरचा महत्त्वाचा वाटा आहे.'' 

कुरआनचा संदेश कामी 

माता-पित्यांची सेवा करा, हा पवित्र कुरआनमधील संदेश आम्ही तरुणांपर्यंत पोचविला. वाट चुकलेल्या तरुणांना या धार्मिक ग्रंथाच्या उपदेशातून पूर्वपदावर आणता येऊ शकते, याची पूर्ण खात्री मला होती, असे धिल्लॉं यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले. ही मुले घरी परतल्यानंतर त्यांच्या माता-पित्यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आजमितीस आम्ही या मुलांची ओळख जाहीर करणे टाळत आहोत, हे सगळे त्यांच्याच भवितव्यासाठी केले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. धिल्लॉं हे 1988 पासून काश्‍मीर खोऱ्यामध्ये कार्यरत आहेत. 

आईशी संवाद 

"प्रत्यक्ष चकमकीच्या स्थळी दहशतवादी आमच्या सापळ्यात अडकल्यानंतर आम्ही त्याच्या आईला त्याच्याशी संवाद साधण्याची संधी देतो. बऱ्याचदा या आणीबाणीच्या प्रसंगीच त्या तरुणाचे मनपरिवर्तन होते आणि तो शस्त्रत्याग करतो. आम्ही किती तरुणांचे एन्काउंटर झाले, हे मोजत नाही तर किती जण आपल्या घरी परतले त्यांची संख्या मोजतो.

आत्तापर्यंत पन्नास तरुणांना आम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे,'' असेही त्यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे आज दगडफेक करणारे तरुणच हे उद्याचे दहशतवादी असल्याचे आढळून आले आहे. दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश करणारे सात टक्के तरुण हे पहिल्या दहा दिवसांमध्ये मारले जातात. नऊ टक्के तरुण महिनाभरात, सतरा टक्के हे तीन महिन्यांमध्ये, 36 टक्के सहा महिन्यांमध्ये तर 64 टक्‍क्‍यांचा वर्षभरात खातमा होतो.

सीमेवरील काही गिधाडे तरुणांना लक्ष्य बनवितात. आता शस्त्रत्याग केलेल्या तरुणांची ओळख आम्ही जाहीर केलेली नाही. भविष्यात हीच मुले महाविद्यालयांमध्ये काम करतील, शेतांमध्ये राबताना दिसतील. 

- कंवलजितसिंग धिल्लॉं, लेफ्टनंट जनरल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under Operation Maa around 50 local militants return to families