जेव्हा दाऊदने केला होता राम जेठमलानींना फोन

टीम ई-सकाळ
Sunday, 8 September 2019

नवी दिल्ली : ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. देशभरातील हायप्रोफाईल केसेस लढवणारे वकील म्हणून, जेठमलानी यांची ओळख होती. जेठमलानी यांचा एवढा दबदबा होता की, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याने त्यांना आपली केस लढवण्यासाठी फोन केला होता.

नवी दिल्ली : ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. देशभरातील हायप्रोफाईल केसेस लढवणारे वकील म्हणून, जेठमलानी यांची ओळख होती. जयललीता, लालू प्रसाद यादव, लालकृष्ण अडवानी अशा बड्या नेत्यांसाठी त्यांनी वकिली केली होती. विशेष म्हणजे, जेठमलानी यांचा एवढा दबदबा होता की, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याने त्यांना आपली केस लढवण्यासाठी फोन केला होता.

chandrayaan 2: ‘विक्रम’ जिंदा है! इस्रोच्या यानाने काढले लँडरचे फोटो

राजकारण वेगळं वकिली वेगळी
केवळ वकील नव्हे तर, कायदे पंडीत म्हणून राम जेठमलानी यांचा दबदबा होता. वाजयेपी सरकारमध्ये त्यांनी कायदा मंत्री म्हणूनही काही काळ काम केले होते. पण, त्यांची ओळख राजकारणी यापेक्षा निष्णात वकील अशीच राहिली. जेठमलानी यांनी राजकीय नेत्यांबरोबरच अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याची केसही लढली होती. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना हवाला प्रकरणातून आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोहराबुद्दीन एन्काउंटर केसमधून बाहेर काढण्याचं काम जेठमलानी यांनी केलं होतं. विशेष म्हणजे, भाजपच्या जवळ असणाऱ्या जेठमलानी यांनी संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूची केसही लढवली होती. राजकारण, आणि वकिली यात कायम अंतर ठेवण्यात जेठमलानी यशस्वी ठरले होते.

‘मोदींवर विश्वास ठेवू नका’, असं सांगणारा डॅशिंग वकील

केजरीवालांकडे मागितली ३ कोटी
दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अब्रनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावर कोर्टात मु्ख्यमंत्री केजरीवाल यांची बाजू राम जेठमलानी यांनी मांडली होती. कोर्टात जेठमलानी यांनी अरुण जेटली यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले होते. ही केस लढविल्यानंतर जेठमलांनी यांनी केजरीवाल यांना तीन कोटी ४२ लाख रुपयांचे बिल पाठवले होते. या जेठमलानी यांच्या बिलाची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. ते बिल केजरीवाल यांनी भागवले की नाही, याची माहिती मात्र मिळालेली नाही.

जेठमलानी निर्भीड होते : पंतप्रधान मोदी

दाऊदचा जेठमलानींना फोन
मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहीम याने आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्याने राम जेठमलानी यांनाच फोन केला होता. त्यावेळी दाऊदने भारत सरकारपुढे अटी ठेवल्या होत्या. त्यात बॉम्बस्फोटाशिवाय असलेल्या इतर केसेस रद्द केल्या जाव्यात आणि अटक केल्यानंतर लगेचच जामीन मिळायला हवा. खटला चालू असेपर्यंत नजर कैदेत ठेवले तरी चालेल, असे दाऊदने राम जेठमलानी यांना सांगितले होते. अर्थात सरकारने दाऊदच्या कोणतिही अट मान्य केली नाही. त्यामुळे दाऊदचे आत्मसमर्पण झाले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: underworld don daud ibrahim called ram jethmalani for surrender