अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं तासाभरात चोख प्रत्युत्तर 

टीम ई-सकाळ
Sunday, 8 December 2019

शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्या ट्विटची तातडीनं दखल घेतली आणि त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई : औरंगाबाद येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवसेना वृक्षतोड करणार असल्याचं, ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला तासाभरातच शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलंय. औरंगाबाद येथे महापालिकेच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या नियोजित स्मारकासाठी एक हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलंय. अमृता फडणवीस यांनी त्या दैनिकाचं कात्रण ट्विट केलंय. हे कात्रण ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला टॅग केलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वृक्षतोड तुमच्या सोयीनुसार स्वीकरली जाते किंवा जेव्हा कमिशन मिळते तेव्हा ती वृक्षतोड मान्य असते. हे तर अक्षम्य पाप आहे. ढोंगीपणा हा एक प्रकारचारोग आहे. लवकर बरे व्हा!
- अमृता फडणवीस 

आणखी वाचा - शिवसेना कमिशनखोर; अमृता फडणवीस यांची टीका

शिवसेनेकडून तातडीने दखल
शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्या ट्विटची तातडीनं दखल घेतली आणि त्यांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात ट्विट करून खुलासा केला. ट्विटमध्ये चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर उपहासात्मक टीका केली. चतुर्वेदी यांनी म्हटलंय की, मॅम, सॉरी तुम्हाला निराश करत आहे. कारण, औरंगाबादच्या महापौरांनी हे स्पष्ट केलंय की, एकही झाड तोडलं जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे बळजबरीन्ं खोटं बोलणं हा सगळ्यांत मोठा रोग आहे. लवकर बऱ्या व्हा. कदाचित झाडं तोडण्यासाठी कमिशन घेणं हे भाजपचं नवं धोरण असावं. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारताना एकही झाडं तोडलं जाणार नाही, असे आमचे प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळी स्मारकाच्या जागेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एकही झाड तोडलं जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही त्यांची आणि आमचीही भूमिका आहे.
-नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena reaction on amruta fadnavis tweet priyanka chaturvedi