रामदास आठवले, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणार; अमेरिकेतल्या हिंसाचारामुळे पक्षाचं नुकसान झाल्याची तक्रार

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत घातलेल्या गोंधळावेळी हिंसाचार झाला. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. 

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत घातलेल्या गोंधळावेळी हिंसाचार झाला. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या संसदेत झालेल्या या प्रकाराचा निषेध जगभरातील नेत्यांनी केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे वाईट असल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

रामदास आठवले यांनी म्हटलं की, मी डोनाल्ड ट्रम्प यांचाशी बोलण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्यामुळे आमच्या रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये झालेली घटना निंदनीय आहे. हा फक्त रिपब्लिकन पक्षाचाच नव्हे तर अमेरिका आणि लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळे मी माझी नाराजी जाहीर करत आहे. ट्रम्प यांच्याशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करेन असंही आठवले यांनी सांगितलं. 

हे वाचा - तात्काळ राजीनामा द्या नाहीतर महाभियोग आणू; ट्रम्प यांना इशारा

अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांची प्रतिक्रिया ही राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वक्तव्यानंतर आला होता. बायडेन यांनी हिंसाचाराच्या या घटनेला ट्रम्प हेच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेच्या सुरक्षेचं उल्लंघन केलं. हे आंदोलन नव्हतं तर एकप्रकारे नासधूस करणं होतं. 

हे वाचा - शक्तीशाली ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार; उरले दोनच पर्याय

ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी शेकडोंच्या संख्येनं संसदेवर हल्ला केला होता. यावेळी समर्थकांनी बिल्डिंगमध्ये घुसखोरी केली. त्यांनी तोडफोड केली आणि अनेक कार्यालयांमध्ये घुसखोरी केली. नॅशनल गार्ड्सनी त्यांना बाहेर काढलं पण तोपर्यंत झालेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us-capitol-violence-union-minister-ramdas-athawale-says-i-will-try-speak-with-donald-trump