
संसदेत झालेल्या हिंसाचार प्रकरणी ट्रम्प हेच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. जरी याविरोधात त्यांच्यावर खटला दाखल करायचा झाला तरी त्यांच्याकडे दोन ट्रम्प कार्ड आहेत.
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राजधानीत गुरुवारी संसद भवनामधे मोठा हिंसाचार झाला. या घटनेला मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या 200 पेक्षा जास्त खासदारांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी किंवा संविधानाच्या नियमांचा वापर करून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर काही लोकांकडून ट्रम्प यांना शिक्षा व्हावी अशीही मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे आता काय होणार असा प्रश्न आहे. कार्यकाळ पूर्ण करणार का? व्हाइट हाऊसमधून तुरुंगात जाणार की काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘ट्रम्प यांची चुकीची समजूत’
अध्यक्षांवर टीका करताना बायडेन म्हणाले,‘‘ट्रम्प यांनी माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कायम हल्ले केले. त्यांना वारंवार जनतेचे शत्रू असल्याचे संबोधले. अशी भाषा केवळ हुकूमशहाच वापरतात. आपल्या मर्जीतले न्यायाधीश नेमून कोणत्याही प्रकरणातून आपण बाहेर पडू अशी ट्रम्प यांची चुकीची समजूत होती. याच न्यायाधीशांनी घटनेचे पालन करत ट्रम्प यांचा आदेश नाकारला, त्यावेळी त्यांना धक्का बसला.’’
ट्रम्प कार्यकाळ पूर्ण करतील का?
जो बायडेन हे 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. आता ट्रम्प यांचा अवघ्या दहा बारा दिवसांचा कार्यकाळही हिंसाचाराच्या घटनेमुळे धोक्यात आला आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणावा असं म्हटलं जात असलं तरी ते कठीण आहे. त्यांची हकालपट्टीही करणं सोपं नाही. माइक पेन्स यांनी जरी जो बायडेन यांना विजयी घोषित केलं असलं तरी ट्रम्प यांची हकालपट्टी करण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगलं आहे. पेन्स यांनी कारवाई न केल्यास संसदेत अध्यक्षांविरोधात महाभियोगाचा ठराव मांडण्याचा इशाराही डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे.
25 व्या घटनादुरुस्तीनुसार हकालपट्टी
मंत्रिमंडळातील सदस्यांची बहुमताने मान्यता असल्यास उपाध्यक्ष हे २५ व्या घटनादुरुस्तीचा आधार घेत अध्यक्षांची हकालपट्टी करू शकतात. अध्यक्षांच्या अत्यंत धोकादायक आणि देशद्रोही कृतीमुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी होणे आवश्यक असल्याचे मत अमेरिकी काँग्रेसच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक शुमर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.
हे वाचा - अमेरिकेत हिंसाचारावेळी तिरंगा कुणी फडकवला? व्यक्तीची ओळख पटली
उपराष्ट्राध्यक्षांची भूमिका महत्त्वाची
बुधवारी संसदेत नियमानुसार मतमोजणी पेन्स यांच्या उपस्थितीतच झाली. त्यांनी ही मते बाद ठरवावीत, अशी ट्रम्प यांची इच्छा होती. मात्र, पेन्स यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार देतानाच असे करण्याचा आपल्याला आणि ट्रम्प यांनाही अधिकार नसल्याचे आधीच सांगितले होते. यामुळे ट्रम्प यांनी माइक पेन्स यांच्यावरही टीका केली होती.
खटला चालणार का?
आता व्हाइट हाउस सोडल्यानंतर ट्रम्प यांना अटक होणार का ? याचीही चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या तपास संस्थांकडे त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. गुरुवारी झालेला हिंसाचार हा त्यांच्याच चिथावणीमुळे झाला हे सिद्ध होऊ शकतं असंही काहींचे म्हणणे आहे. कार्नेल लॉ इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डेव्हिड ओव्हीन यांनी म्हटलं की, हिंसचाराला ट्रम्पच जबाबदार आहेत. त्यांनी गुन्हा केला असून त्यांच्याविरोधात खटला चालवला पाहिजे.
हे वाचा - ट्रम्प म्हणे, मी हिंसेने व्यथित, US कायद्याचं राज्य; सत्तेचे सुव्यवस्थित करेन हस्तांतरण
ट्रम्प यांच्याकडे दोन पर्याय
संसदेत झालेल्या हिंसाचार प्रकरणी ट्रम्प हेच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. जरी याविरोधात त्यांच्यावर खटला दाखल करायचा झाला तरी त्यांच्याकडे दोन ट्रम्प कार्ड आहेत. पहिलं म्हणजे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते कोणत्याही चुकीसाठी स्वत:ला माफ करु शकतात. दुसरं म्हणजे माफी मिळाली नाही तर केस बराचं काळ चालेल. अशावेळी कायद्यातील पळवाटा शोधून ते स्वत:लाल वाचवतील. त्यांच्याविरोधात असलेले पुरावे थेट सिद्ध करू शकत नाहीत. त्यांनीच समर्थकांना हिंसा करा असं सांगितल्याचं स्पष्ट होणं कठीण आहे. याशिवाय साक्षीदार मिळणंही या परिस्थिती शक्य नाही.