वेळेत मिळाली नाही रुग्णवाहिका; लेकीच्या मृतदेहाला कवटाळलेल्या पित्याचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक  आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. 

लखनऊ - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक  आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी बापाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबियांनी असा आरोप केला की अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी कोणतीच गाडी मिळाली नाही. हतबल झालेल्या बापाने मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना अनेकदा विनंती केली मात्र अॅम्ब्युलन्समधून मृतदेह घरी पाठवून देण्याची सोय जिल्हा रुग्णालयाला करून देता आली नाही. 

रुग्णालयातील डॉक्टर एके शर्मा यांनी हतबल बापाच्या विनंतीनंतर त्यांना सांगितलं की, अॅम्ब्युलन्समध्ये डिझेल भरा आणि मुलीचा मृतदेह घेऊन जा. डिझेलसाठी सरकार पैसे देत नाही. डॉक्टरांच्या या उत्तराने आधीच लेक गमावलेल्या बापाची अवस्था आणखीनच बिकट झाली. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आरोग्य अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक तास वाहन मिळण्यासाठी वाट बघावी लागली. 

हे वाचा - पोलिसाने जमवली तब्बल 70 कोटींची मालमत्ता; ACB कडून कारवाई सुरु

पीडित कुटुंबिय जौनपुर जिल्ह्यातील पुरा गावात राहते. त्यांच्या 15 वर्षांच्या मुलीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारासाठी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारावेळीच मुलीचा मृत्यू झाला. मुलीला मृत घोषित केल्यानंतर तब्बल तीन तास मृतदेह घेऊन जाण्यासाठी गाडी मिळाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा - राफेल कराराची 'क्रोनोलॉजी' आता समजली; CAG अहवालावरुन काँग्रेसचा निशाणा

दरम्यान, बाप लेकीच्या मृतदेहाला कवटाळून सतत आक्रोश करत मदतीसाठी याचना करत होता. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णालयात फक्त दोन अॅम्ब्युलन्स असून त्या बाहेर पाठवण्यात आल्या होत्या. तिथून परत यायला काही तास लागल्याचं डॉक्टर म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh ambulance not available on time father crying