जग व्हॅक्सिनच्या मागे आणि उत्तर प्रदेशात पोटातले जंत मारण्याच्या औषधाने कोरोनावर उपचार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 August 2020

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावर व्हॅक्सिनचा शोध सुरु आहे. रशियाने व्हॅक्सिन तयार केल्याची घोषणाही करून टाकली आहे. 

नवी दिल्ली - भारतासह जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनावर व्हॅक्सिनचा शोध सुरु आहे. रशियाने व्हॅक्सिन तयार केल्याची घोषणाही करून टाकली आहे. तर इतर देशांमध्ये व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. असे असताना भारतातील उत्तर प्रदेशात मात्र पोटातील जंत मारण्याच्या औषधाने कोरोना बरा करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळेच पोटातील जंत मारण्याच्या औषधाची सध्या मागणी वाढली आहे. लखऊच्या CMO नी 19 ऑगस्टला लिहिलेली एक औषधाची चिठ्ठी व्हायरल झाली आहे. यात औषधाचे नाव लिहिलं असून ते कोरोनापासून वाचण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं म्हटलं आहे.  ही चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत याची मागणी वाढली आहे. 

दिल्लीतील केमिस्ट प्रियांशने म्हटलं की, आतापर्यंत पोटातील जंत मारण्याचं औषध महिन्याला जास्ती जास्त एक डबा कसातरी संपायचा पण आता दहा ते पंधरा दिवसात विक्री होत आहे. दिल्लीमध्ये याचा वापर कमी होत आहे. शहरातील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे डॉक्टर एमएस सुनिल कुमार यांनी सांगितलं की, दररोज नवनवीन शोध लागत असल्यानं कोरोनाच्या रुग्णांसाठीचं औषधही बदलत आहे. सुरुवातील मोठ्या प्रमाणावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन दिलं जात होतं. मात्र याचा प्रभाव न दिसल्यानं वापर कमी झाला. म्हणूनच उत्तर प्रदेश सरकारने हे औषध दिलं असेल. दिल्लीत बरेच चांगले पर्याय उपलब्ध आहेत. रेमडेसिवियर, प्लाझ्मा थेरपी यांचा वापर होत असल्यानं इतर औषध कमी वापरली जात आहेत असंही सुनिल कुमार म्हणाले. 

हे वाचा - सर्व प्रकारच्या साथींना रोखण्यासाठी तयार करणार लस; केंब्रीज विद्यापीठाकडून पुढाकार

पोटातील जंत मारण्यासाठीचं आयवर मेक्टिन 12 MG या औषधाचे दोन डोस सात दिवसांच्या अंतराने द्यायला हवेत. पण आता उत्तर प्रदेश सरकारच्या नियमावलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तीन दिवसांनी एक गोळी घेण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीतील एका डॉक्टरांनी म्हटलं की, या औषधाने कोरोनाचा प्रभाव कमी होतो. ऑस्ट्रेलियात झालेल्या संशोधनात याबद्दलची माहिती समोर आली आहे. आता अनेक औषधांचा अशा प्रकारे वापर होत आहे. हेच औषध डेंग्यु असेल तर काही प्रमाणात दिलं जातं. मात्र आतापर्यंत याबाबत AIIMS ने काही सांगितलेलं नाही. 

हे वाचा - रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते

कोरोना व्हॅक्सिनचा शोध न लागल्यानं आतापर्यंत वेगवेगळ्या गोळ्या आणि औषधं वापरली गेली आहेत. मात्र कोणतंही औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं घातक ठरू शकतं. कोरोनावर होत असलेल्या संशोधनानुसार औषधांच्या वापराबाबत नवी माहिती समोर येत आहे. सध्या तरी यावर ठोस असं औषध नसलं तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगने कोरोना रोखता येतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh governments advice stomach worm medicine for covid19 treatment