उन्नाव पुन्हा हादरलं; जंगलात गेलेल्या 3 पैकी 2 मुलींचा संशयास्पद मृत्यू

टीम ई सकाळ
Thursday, 18 February 2021

तीन अल्पवयीन मुली जंगलात गेल्या होत्या त्यातल्या दोघी मृतावस्थेत तर एक बेशुद्धावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात धक्कादायक अशी घटना घडली आहे. तीन अल्पवयीन मुली जंगलात गेल्या होत्या त्यातल्या दोघी मृतावस्थेत तर एक बेशुद्धावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तिन्ही मुलींना एकत्र बांधून घालण्यात आलं होतं. उन्नावमधील बबरुहा गावात बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उन्नावमधील बबरुहा गावातल्या तीन मुली बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे जंगलात जनावरांना चारा आणण्यासाटी गेल्या होत्या. मात्र सायंकाळ झाली तरी घरी परत आल्या नव्हत्या.  तिघीही चुलत बहिणी होत्या. मुलींच्या नातेवाइकांनी म्हटलं की, बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मुली न परतल्यानं त्यांना शोधण्यासाठी घरचे लोक गेले. तेव्हा तिघीही बेशुद्धावस्थेत एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत सापडल्या.

हे वाचा - पेट्रोल दरवाढीची चिंता; पंतप्रधान मोदींनी तेल उत्पादक देशांना दिला सल्ला

मुली सापडल्यानंतर तिघींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. त्याठिकाणी डॉक्टरांनी दोघींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं तर तिसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं म्हणाले. बेशुद्धावस्थेत असलेल्या तिसऱ्या मुलीला पुढील उपचारासाठी कानपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरणही निर्माण झालं आहे. दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. उन्नावचे पोलिस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी गावात जाऊन घटनेचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळावर खूप फेस आढळून आला होता. यावरून विषामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होईल. 

हे वाचा - कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले

घटनेचं गांभीर्य ओळखून लखनऊमधून एडीजी एस एन साबत आणि आयजी लक्ष्मी सिंह उन्नावमध्ये पोहोचल्या होत्या. दोन्ही अधिकाऱ्यांनी रात्रीच सर्व घटनेची माहिती घेतली आणि पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश दिले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमही पोहोचली असून तपास करत आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh unnao two minor girls found dead in jungle