प्रलयात १३ गावांचा संपर्क तुटला: अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 February 2021

बोगद्यात अडकलेल्यांना सुरक्षित वाचविण्यासाठी व बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी हवाई दल, एनडीआरएफ, आयटीबीपी व इतर निमलष्करी दलांच्या जवानांच्या पथकांची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.

नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये नुकत्याच आलेल्या नैसर्गिक प्रलयात २० लोकांचा मृत्यू झाला असून काल संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार १९७ लोक अजूनही बेपत्ता आहेत. तसेच १३ गावांचा संपर्क तुटला, असे गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत सांगितले.

उत्तराखंडातील नैसर्गिक संकटाबाबत शहा यांनी आज वरिष्ठ सभागृहात निवेदन दिले. ते म्हणाले की, उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रांनुसार ऋषीगंगा नदीच्या पात्रात ७ फेब्रुवारीला ५६०० मीटर उंचीवरील ग्लेशियरमधून हिमस्खलन झाले. यामुळे या नदीत पाण्याचा दबाव वाढून परिसरात पुराची आपत्ती आली. या दुर्घटनेत धौलगंगा नदीवर बांधण्यात येणारा ‘एनटीपीसी’चा ५२० मेगावॉटचा विद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाला.

ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा 

अजूनही बेपत्ता असलेल्यांत एनटीपीसी प्रकल्पावरील १३९, ऋषीगंगा परियोजनेवर काम करणारे ४६ व १२ ग्रामीण नागरिकांचा समावेश आहे. एका बोगद्यात अडकलेल्या एनटीपीसीच्या १२ व ऋषीगंगा योजनेवरील १५ जणांना आतापर्यंत वाचविण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेल्यांना सुरक्षित वाचविण्यासाठी व बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी हवाई दल, एनडीआरएफ, आयटीबीपी व इतर निमलष्करी दलांच्या जवानांच्या पथकांची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. या पुरात किमान १३ गावांचा संपर्क तुटला. त्या गावांत हेलिकॉप्टरच्या द्वारे अन्नधान्य व औषधे पोचविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. उत्तराखंडला लागणारी सर्व मत केंद्रातर्फे तत्काळ पोहोचविली जात आहे.

हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttarakhand-floods-updates 13 villages Contact was lost says amit shah