काँग्रेसचा फुसका बार

rahul gandhi and sonia gandhi
rahul gandhi and sonia gandhi

काँग्रेसच्या तेवीस ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वबदलाची मागणी करूनही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदावर निष्ठावंतांनी शिक्कामोर्तब केल्याने बंडाळीचा बार फुसका ठरला. सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ केल्याच्या बातम्या आल्या. नेतृत्वबदल होणार, अशी आशाही वाटू लागली. पण, तसे काहीच झाले नाही. उलट, आपले नेतृत्व कुणाला नको आहे, याचा स्पष्ट अंदाज या बंडाळीमुळे सोनिया, राहुल व प्रियांका (गांधी वद्रा) यांना आला. तथापि, 23 नेत्यांविरूद्ध त्या कारवाई करण्याच्या स्थितीत नाहीत. काँग्रेस सत्तेत असती, तर हे घडले नसते व बंडाळी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली असती. सत्तेत नसूनही, काँग्रेसची जागिरी गांधी घराणे सोडायला तयार नाही, हे घडामोडींवरून दिसून आले. काँग्रेस रसातळाला जाणे हे देशहिताचे नसले, तरी ते आता दृष्टिपथात येत आहे. वर उल्लेखिलेले तीन शीर्षस्थ नेते काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळवून देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत. लोकसभेच्या पुढील निवडणुकात काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ 52 ऐवजी 25 झाले, तरी त्या काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार नाही काय?  

गेल्या सहा वर्षात मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यात काँग्रेसची सरकारे आली. त्यातील मध्यप्रदेशचे सरकार गडगडले व राजस्थानमधील सरकार कसेबसे आज वाचले आहे. ते केव्हा पडेल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. त्यामुळे, कोसळणाऱ्या काँग्रेसच्या शिडात बरीच हवा भरली होती. परंतु, भाजपच्या झंझावाती राजकारणात काँग्रेस टिकाव धरेल की नाही, हे सांगणे कठीण. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, की 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा बाजी मारणार. कारण राष्ट्रीय पातळीवर मोदी व भाजपला सज्जड आव्हान देणारा एकही विरोधी पक्ष दिसत नाही. निवडणुका आल्या की विरोधक मोट बांधण्याचा प्रयत्न करतात. पण, पुन्हा जागांच्या वाटपांवरून मतभेद होऊन ऐक्याचा खेळ विस्कटतो. 

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नाजुक स्थितीबाबत मनिष तिवारी व अन्य काही नेत्यांनी आवाज उठविला, तेव्हा राहुल गांधी यांचे निकटवर्तीय व युवक काँग्रेसचे माजी अध्य़क्ष राजीव सातव यांनी त्यांना फटकारले होते. त्यामुळे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदांवर काम केलेले नेते नाराज झाले. म्हणून, शशी थरूर यांनी पुढाकार घेऊन गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिबल, वीरप्पा मोयली, भुपेन्द्र हुडा, पृथ्वीराज चव्हाण, मनिष तिवारी, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, राज बब्बर, मुकुल वासनिक, संदीप दिक्षित आदी नेत्यांनी सोनियांना पत्र लिहिले. 

त्यात उपस्थित केलेले मुद्दे केवळ रास्त नाहीत, तर त्यावर गांभीर्याने विचार व कृती होण्याची गरज आहे. नेतृत्वाच्या संदर्भात अनिश्चितता असल्यामुळे पक्ष भरकटला असून, कार्यकर्त्यात निराशा पसरल्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. गेल्या निवडणुकात युवकांनी मोदींना मते दिल्याने तरूण पिढीचा काँग्रेसवरील विश्वास कमी झाला आहे, ही गंभीर बाब होय. पक्षाला पूर्णवेळचे कार्यक्षम, सक्रीय, दृश्यमान नेतृत्व हवे आहे, हे मुद्दे मांडून कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्याची मागणी त्यात होती. त्याचप्रमाणे नेतृत्वाबाबत संस्थात्मक यंत्रणेची गरज असून, त्याद्वारे सामुहिकरित्या पक्षाचे पुनरूत्थान करता येईल, असे सुचविले होते. भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमळे सामाजिक सहिष्णुतेचे वातावरण राहिलेले नाही. शिवाय, करोनाचे संकट व आर्थिक स्तरावर घसरण व चीनच्या घुसखोरीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानामुळे परराष्ट्र धोरणही भरकटलेले आहे. राज्यस्तरावरील संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पावले टाकणे, गरजेचे आहे, असेही त्यात म्हटले आहे. हे सर्व मुद्दे ठाऊक असूनही त्यादिशेने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गेल्या सहा वर्षात विचारपूर्वक व निर्धाराने पावले टाकली नाही. काँग्रेसची ही संघटनात्मक शोकांतिका होय. 

निवडणुकीत पराभव झाला की कार्यकारिणीची बैठक होते. पराभवास सोनिया वा राहुल गांधी जबाबदार होते, असे जाहीर म्हणण्याचे धाडस कुणी करीत नाही. सामुहिक नेतृत्वाला अथवा कोणत्यातरी नेत्याला बळीचा बकरा करूनही त्याच्यावर काही कारवाई होत नाही. सामुहिक नेतृत्वासाठी संसदीय मंडळाचे पुनर्गठऩ करण्याबाबत व काँग्रेसच्या 24 अकबर मार्गावरील मध्यवर्ती कार्यालयात सरचिटणीस आदींची आवश्यक उपस्थिती यावरही बंडखोर नेत्यांनी आवाज उठविला.

काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीत या मुद्यांवर चर्चा होण्याएवजी एकनिष्ठांनी बंडखोरांवर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी या प्रकृतीस्वाथ्यासाठी काही दिवस रूग्णालयात दाखल झाल्या असताना या नेत्यांनी त्यांचा विचार न करताच पत्र लिहिण्याचा व ते वृत्तपत्रांना देण्याचा उद्योग केला, याबाबत आक्षेप घेण्यात आला.         
    
सोनिया गांधी यांच्या नाजुक प्रकृतीकडे व राहुल गांधी यांच्या धरसोडीचे धोरण पाहाता, या नेत्यांना काळजी वाटणे सहाजिक. तथापि, माजी पंतप्रधान डा. मनमोहन सिंग, निकटवर्तीय अहमद पटेल, मोतिलाल व्होरा तसेच, ए.के.अँटनी, अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, भूपेश बाघेल हे मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, कुमारी शेलजा रिपन बोरा, अधिर रंजन चौधरी, सिद्धरामैय्या, सलमान खुर्शिद, के सुरेस आदी निष्ठावंताना पक्षनेतृत्वाबाबत जैसै थे व्यवस्था हवी आहे. याचा अर्थ अखिल भारतीय काँग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत पक्षात कोणतीही सुधारणा होण्याची शक्यता नाही. 

दरम्यान, पत्रात उपस्थित केलेले मुद्दे रास्त आहेत, असे बंडखोर नेत्यांनी म्हटले आहे. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आहेत. बंडखोरांच्या यादीत त्यांचेही नाव असल्याने त्यांना बदलून सोनिया अन्य नेत्याला नेमणार काय, हे पाहावे लागेल. लोकसभेत यापूर्वी मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे नेते होते. त्यांना बदलून सोनिया गांधी यांनी अधिर रंजन चौधरी यांची नेमणूक केली. आनंद शर्मा यांच्याकडेही पक्षाच्या राज्यसभेतील संसदीय कार्याचा असेलला भार सोनिया गांधी कमी करणार काय, हे पाहावे लागेल. आश्चर्य म्हणजे, या घडामोडीत ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयराम रमेश यांनी बाळगलेले मौन.

23 नेत्यांच्या पत्रामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की पक्षात उभी फूट पडली नसली, तरी मानसिकदृष्ट्या पक्ष दुभंगला आहे. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्याशी जागांविषयी समझोता करून दुय्यम स्थान स्वीकारून  निवडणुका लढवाव्या लागतील. पश्चिम बंगालमध्ये खरी लढत भाजप विरूद्ध तृणमूल काँग्रेस यात असून डाव्या आघाडीशी समझोता केला, तरच काँग्रेसला आपले अस्तित्व टिकविता येईल. 

यापूर्वी, इंदिरा गांधी, राजीव गांधी व पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद व पंतप्रधान पद अशी दोन्ही पदे होती. पुढे राव यांचे अध्यक्षपद काढून घेण्यासाठी सोनिया गांधी यांनी सीताराम केसरी यांच्या मदतीने राव यांना काढले. केसरी अध्यक्ष झाले खरे, पण त्यांनाही सोनिया गांधी यांनी अपमानास्पद रित्या त्या पदावरून काढले. सोनिया गांधी यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवार, तारिक अन्वर व पूर्णो संगमा यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला. तेव्हापासून सोनियांनी पक्षावरील पकड घट केली असून नंतरच्या काळात त्यांनी गांधी घराण्याव्यतिरिक्त हे पद कुणाकडेही जाऊ दिलेले नाही. मी वा राहूल गांधी, अथवा कुणीच नाही, असेच त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा बदलाची वेळ येईल, तेव्हा ते राहुल गांधी यांच्याकडे जाण्याचीच शक्यता अधिक. पण, ज्या नेत्याला राजकारणात 24x7 रस नाही, त्याचा (राहुल गांधी) बदललेल्या भारतीय राजकारणात टिकाव लागणार कसा, हा खरा प्रश्न आहे. 

सारांश, काँग्रेसची अवस्था केंद्रीय पातळीवरील प्रादेशिक वा स्थानीय पक्षासारखी झाली आहे, ती ही सोनिया व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली. दोघेही डोळ्याला झापडं लावून काँग्रेसचा होणारा लय पाहात आहेत, हीच देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब होय.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com