esakal | 'गांधीजी खिशात ठेव'
sakal

बोलून बातमी शोधा

mahatma gandhi

गांधीजींशिवाय देशातील राजकीय पक्षांचं पान हलू शकत नाही. पण, नोटांवरील त्यांच्या प्रतिमेला असलेलं महत्व वगळता, राजकीय पक्ष गांधीजींच्या छायाचित्रांचा वापर केवळ मतं मिळविण्याठी करतात, हे ही तितकंच खरं.

'गांधीजी खिशात ठेव'

sakal_logo
By
विजय नाईक

लहान मुलांची बुद्धी अफाट असते. ते आउट ऑफ द बॉक्स विचार करतात. मनात असेल, ते ते बोलतात. त्याला ओरिजिनल टच असतो, असे बालकांचे मानसशास्त्रज्ञ सांगतात. अलीकडे माझा दोन वर्षांचा नातू इशान याचे बोलणेही मला चकीत करून गेले. लहान मुलांना पिगी बँक दिली, की त्यात ते नाणी, नोटा जमा करीत राहतात. अधुनमधून दिलदार मुलांनी चांगल्या समाज कार्यासाठी पिगी बँकेतील पैसै देणगी म्हणून दिल्याचेही वृत्त येते. इशानला ससुल्ल्यागडीची एक पिगी बँक मी आणली. त्यात तो नाणी टाकू लागला. तेव्हा त्याला मी काही नोटा दाखविल्या. त्यावरील गांधीजींचे चित्र पाहताच, हे कोण, असं त्यानं विचारलं. ते गांधीजी आहेत, असं मी सांगितलं. काही वेळानं फळं आणायला गेलो, तेव्हाही तो बरोबर होता. खिशातून नोट काढून मी फळं विकत घेतली व घरी आलो. त्यानं मला पुन्हा नोटा बघायला मागितल्या, तेव्हा दहा, वीस, पन्नास व शंभर रूपयांच्या नोटा मी त्याला दाखविल्या. त्याचं कुतुहल थांबत नव्हतं. नोटांवरील गांधीजींच्या चित्राकडे तो निरखून पाहात होता. दुसऱ्या दिवशी त्याला बरोबर घेऊन मी बाहेर पडणार, तेवढ्यात इशान म्हणाला, बाबा, गांधीजी खिशात ठेव. मी काहीसा दिग्मुढ झालो. काय म्हणतोय, हे पुन्हा विचारलं, तेव्हा तो म्हणाला, गांधीजी खिशात ठेव. आपल्याकडे खूप गांधीजी आहेत. मला हसू आवरेना. आणि ते खरं ही आहे, पुरेसे गांधीजी (पैसे) खिशात असल्याशिवाय आपण खरेदी करू शकत नाही. गांधीजींशिवाय देशातील राजकीय पक्षांचं पान हलू शकत नाही. पण, नोटांवरील त्यांच्या प्रतिमेला असलेलं महत्व वगळता, राजकीय पक्ष गांधीजींच्या छायाचित्रांचा वापर केवळ मतं मिळविण्याठी करतात, हे ही तितकंच खरं. गांधीजी म्हणत, तसं प्रत्येक गरीबाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं त्यांचं स्वप्न स्वातंत्र्याला 74 वर्ष उलटली, तरी आपण प्रत्यक्षात आणू शकलेलो नाही.  

नोटांवरील गांधीजींच्या चित्राप्रमाणेच अमेरिकन डॉलरवर जॉर्ज वॉशिंग्टन व अब्राहम लिंकन, पाकिस्तानमधील रूपयावर महंमद अली जिना, चीनच्या युवान वरील माओत्से तुंग यांची तसेच, निरनिराळ्या देशातील चलनी नोटांवर त्या त्या देशातील राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या नेत्यांची छायाचित्रे आहेत. इतिहासातही राजमुद्रेवर तत्कालीन राजांची मुद्रा असे. त्यामुळे त्या नाण्याला अनन्य साधारण महत्व होते. त्यांच्या चित्रांमुळे त्या चलनाची विश्वासार्हता वाढत होती, तसेच आजही आहे.   

हे वाचा - गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव

पिगी बँकेत नाणी टाकताना इशानचं लक्ष त्यावरील अशोकस्तंभानंही वेधून घेतलं, याचं कारण, त्यावरील  सिंहांच्या मुद्रा. कारगिलच्या युद्धाचं वार्तांकन करण्यासाठी मी गेलो असता, प्रसिद्ध तोलोलिंग येथील टायगर हिलच्या पायथ्याशी अशोकस्तंभाची एक मूर्ती  मला सापडली होती. ती त्याला दाखविता, इशान खूष झाला. नाण्यावरील अशोकस्तंभ तो काढू शकत नव्हता. पण, सापडलेली मूर्तीकडे हातात घेऊन तो बराच वेळ पाहाता राहिला. त्याच्या खेळण्यात सिंह व इतर प्राणी आहेतच, तसंच पुस्तकातील छायाचित्रांवरून अऩेक प्राणी, पक्षी यांना तो ओळखतो. पिगी बँक असल्याने त्यात नाणी टाकताना तो अर्थातच त्यांच्याशी खेळू लागला. तेव्हा पैसे खेळायचे नसतात, हे त्याला सांगताना मला राजकारण व व्यवहारात होणाऱ्या पैशाच्या, कोट्यावधी रूपयांच्या खेळाची आठवण झाली. 

देशातील काळा पैसा नाहीसा करण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाएकी रात्रीतून जाहीर केलेली नोटाबंदीही आठवली. पण, दोन हजार रूपयांच्या नोटांचा साठा करून काळ्यापैशांचा संचय करण्याबाबत पुराव्यासह जेव्हा बातम्यांचे पेव फुटले, तसे एप्रिल 2019 पासून सरकारने त्या छापणेच बंद केले. तत्पूर्वी असलेल्या 2000 रूपयांच्या नोटा तेवढ्या चलनात आहेत. काळ्यापैशाला प्रत्यक्षात किती निर्बंध बसला, याचा तपशील उपलब्ध नाही. शिवाय, दोन हजार रूपयांची नोट बाजारात सुटी करण्यास कुणी तयार होत नसे. त्यामुळे प्रत्येकाची पंचाईत होई. आज बँकेतून पैसे काढण्यास गेले, की मिळतात, फक्त पाचशे, शंभर, दोनशे रूपयांच्या नोटा. त्यामुळे बाजाराहट करण्यास अडचण येत नाही. तरीही पाचशे रूपयांच्या नोटेकडे आपण व दुकानदार ती खरी आहे, की खोटी हे निरखून पाहतात. प्रत्येक नोटेवरील हिरव्या रंगाची पट्टी योग्य ठिकाणी आहे काय, हे आपण पाहातो. याचे कारण, ती बनावट तर नाही, याची खात्री करावयाची असते. पाकिस्तानातून दोन हजार व पाचशे रूपयांच्या बनावट नोटा नेपाळमधून गेले काही वर्ष देशात येत आहेत. त्यामुळे, सरकारही सतर्क आहे. 

हे वाचा - तिरंग्याच्या प्रतिकृतेतील केक कापणे हा अवमान नाही : हायकोर्ट

आणखी एक गोष्ट म्हणजे, दहा रूपयाचे नाणे. आजही अऩेक बनावट नाणी व्यवहारात आहेत. प्रत्येक नाण्याच्या मागे अवतरण चिन्हासारखे दहा दांडे असतात. आपण ते नेहमीच पडताळतो, असे नाही. त्यामुळे, चिल्लर पैसे मिळाल्यास त्यात दहापेक्षा अधिक दांडे असलेले दहा रूपये आपण न कळत घेऊन येतो. नंतर ते कुणी स्वीकारण्यास तयार नसल्याने त्यांचं मूल्य शून्य ठरतं. 

पैसै देता - घेताना आपण फक्त ते किती रूपये आहेत, एवढंच पाहातो. त्यावरील ना गांधीजी, ना दुसऱ्या बाजूस असलेल्या अयतिहासिक चित्रांकडे आपलं लक्ष असतं. बारकाईनं पाहिलं, तर दहा रूपयांपासून दोन हजार रूपयांच्या प्रत्येक नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं सोज्वळ छायाचित्र आहे. दुसऱ्या बाजूला दहा रूपयांच्या नोटेवर कोणार्कचे सूर्य मंदिर, वीस रूपयांच्या नोटेवर वेरूळमधील लेणी, पन्नास रूपयांच्या नोटेवर कर्नाटकातील हम्पी साम्राज्यातील रथ, शंभर रूपयांच्या नोटेवर रानी की वाव (गुजरातच्या पाटण येथील मजले व आकर्षक पायऱ्या असलेली विहीर), दोनशे रूपयांच्या नोटेवर सांचीचा स्तूप, पाचशे रूपयांच्या नोटेवर दिल्लीचा लाल किल्ला, दोन हजाराच्या नोटेवर मंगलायन  अशी अयतिहासिक चित्रे आहेत. त्यातून भारतातील वैशिष्ठ्यपूर्ण शिल्पकला व स्थापत्यांचा हजारो वर्षांचा इतिहास डोळ्यापुढे तऱळतो. 

हे वाचा - २३ मार्च रोजीच का साजरा केला जातो शहीद दिवस?; जाणून घ्या त्यामागील कारण...

प्रत्येक जण दिवसातून दैनंदिन खरेदी विक्रीसाठी अऩेकदा नोटा हाताळीत असतो. पण, या चित्रांबाबत आपण इतके अनभिज्ञ असतो, की चित्रे कोणची आहेत, असे विचारले, तर त्याकडे बारकाईने पाहिल्याशिवाय क्षणात उत्तर देता येत नाही.  नोटांच्या दुसऱ्या बाजूंची छायाचित्रे भाची निता हर्चेकर हिने जानेवारीमध्ये  व्हॉट्सअपवर पाठविली. भारतीय चलन म्हणून या नोटा अस्तित्वात आहेत काय, अशी पृच्छा केली. आश्चर्य म्हणजे, अमेरिकेत मुलाकडे गेलेली तिची आई सुषमा गोखले हिने उत्तर पाठविले, की या नोटा मी पाहिलेल्या नाहीत. ती मूळची पुण्याची. सारं आयुष्य पुण्यात गेलेलं. तहीही या नोटा ती ओळखू शकली नाही. यावरून आपण नोटांवरील अयतिहासिक छायाचित्रांकडे किती दुर्लक्ष करतो, हे दिसतं. एकदा का गांधीजी दिसले, की ती नोट खरी मानून देवाण घेवाण होते. 

आणखी एक बाब म्हणजे, निरनिराळ्या बँकांची डेबिट-क्रेडिट कार्डस् अस्तित्वात असून खरेदी विक्रीसाठी पेटीम, गुगल पे, फ्रीचार्ज, फोनपे, ऑक्सिजन वॅले, जिओमनी वॅले, भीम कार्ड आदी उपलब्ध असल्याने नोटा वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सरकार त्याला चालनाही देत आहे. व्यवहार परस्पर बँकेतून होतात. पर्यायी कार्ड (पेपर मनी) वापरल्यास नोटा वापरण्याची गरज भासत नाही. तरीही दैनंदिन व्यवहारात प्रत्येक वेळी कार्ड वापरणे शक्य होत नाही व त्यातील माहिती चोरून बँकेतील पैशाची चोरी होण्याची शक्यता टाळता येत नाही. बारीकसारीक खरेदीसाठी रोख रक्कम ठेवावीच लागते. म्हणूनच इशाननं म्हटल्याप्रमाणे खिशात गांधीजी ठेवल्याशिवाय बाजारात पाऊल टाकता येत नाही. गांधीजी सोबत असणं, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय, हे ही तितकच खरं.