गँगस्टर विकास दुबेचं IPL कनेक्शन; एका वर्षात 6 बँक खात्यांतून 75 कोटींचे व्यवहार

vikas dube
vikas dube

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर एन्काउंटरमध्ये ठार कऱण्यात आलेल्या गँगस्टर विकास दुबे आणि त्याचा सहकारी जय वाजपेयी यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिस चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, विकास दुबे आणि जय वाजपेयी यांच्यामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास 75 कोटी रुपयांची देवघेव झाली आहे. हे व्यवहार 6 बँक खात्यांमधून करण्यात आले असून यातील 5 कोटी रुपये आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी वापरल्याचेही समोर आले आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी सर्व कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयाकडे पाठवले आहे. पोलिसांच्या चौकशीत अशीही माहिती मिळाली आहे की, विकास आणि जय यांच्यामध्ये फक्त बँक खात्यांवरच नाही तर रोख रकमेचे सुद्धा कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये असं समजलं आहे की, त्यांनी आय़पीएलच्या सट्ट्यात 5 कोटी रुपये लावले होते. पोलिस आणि एसटीएफच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार विकास बरेच पैसे सट्ट्यावर लावायचा. जय वाजपेयी ऑनलाइन सट्टा लावायचं काम करायचा. यात परदेशी लोकांकडूनही सट्टा लावल्याचं समोर आलं आहे. 

विकास दुबेचा फंड मॅनेजर जय वाजपेयीची चौकशी करण्यात येत असून तपास यंत्रणा वेगाने तपास करत आहेत. आयकर विभागाकडून जयच्या 9 मालमत्तांची चौकशी करण्यात येणार आहे. जयविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने तपास सुरू केला आहे. त्याच्या ब्रह्मनगरमधील 6 घरे, आर्यनगरमधील 2 घरे आणि पनकी इथल्या 1 घरांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 

दरम्यान, लखनऊमध्ये एसआयटीला कार्यालय देण्यात आलं असून तिथून काम सुरू केलं आहे. एसाआयटीने या प्रकऱणातील साक्षी नोंदवण्याचं काम सुरू केलं असून याप्रकरणी इमेल आयडी आणि संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. sit-kanpur@up.gov.in  आणि 0522-2214540 या नंबरवर माहिती देता येणार आहे. 

आता विकास दुबे बद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दादरी सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या ओपीडीची एक पावती व्हायरल झाली आहे. त्यामध्ये विकास दुबेचं नाव आहे. ही पावती त्याच दिवशीची आहे ज्या दिवशी विकास दुबेचा कानपूर इथं एन्काउंटर झाला. व्हायरल होत असलेल्या पावतीवर विकास दुबे, वय 53 राहणार कानपूर असंही लिहिलं आहे. आता या प्रकरणाचीसुद्धा चौकशी केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com