पहिल्या लेडी रोबोची झलक व्हायरल; 'या' जबाबदाऱ्या पार पाडणार

वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

  • गगनयान'मध्ये "इस्रो'ची "व्योममित्र'
  • अंतराळात पार पाडणार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेप्रमाणेच (इस्रो) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही ड्रीम प्रोजेक्‍ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित गगनयान मोहिमेला आधुनिक तंत्रस्पर्श होणार आहे. इस्रोच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 2021 हे साल उजाडणार असलेतरीसुद्धा या मोहिमेच्या आधीच "गगनयान'च्या माध्यमातून व्योममित्र नावाची लेडी रोबी भारताकडून अवकाशात पाठविण्यात येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज येथे "ह्युमन स्पेसफ्लाइट अँड एक्‍स्प्लोरेशन- प्रेझेंट चॅलेंजेस अँड फ्युचर ट्रेंड्‌स' या विषयावर आयोजित विशेष चर्चासत्रामध्ये या रोबीची छोटीशी झलक पाहायला मिळाली. या लेडी रोबोला "व्योममित्र' असे नाव देण्यात आले असून, ते संस्कृत आहे. यातील "व्योम' या शब्दाचा अर्थ अवकाश होय. आज येथील चर्चासत्रामध्ये व्योममित्रने उपस्थितांना स्वत:चा परिचय करून दिल्यानंतर सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

मोहिमेवर देखरेख
"सर्वांना नमस्कार, माझे नाव व्योममित्र.. गगनयान या पहिल्या मानवविरहित मोहिमेसाठी मला तयार करण्यात आले आहे, असे सांगतानाच तिने या मोहिमेतील तिच्या जबाबदारीविषयीदेखील भाष्य केले. या मोहिमेवर देखरेख ठेवणे, हे माझे काम असेल. तुम्हाला मोहिमेबाबत अलर्ट करतानाच जीवनरक्षक प्रणालीप्रमाणेही ही रोबो काम करेल. स्वीच पॅनल ऑपरेशन्ससारखी अवघड कामेही ती लीलया पार पाडू शकते. या महिला रोबोनेच आपण अंतराळवीरांसोबत संभाषण साधू शकतो, तसेच त्यांच्यासोबत अंतराळामध्येही जाऊ शकतो, असे सांगतानाच त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याएवढी क्षमता आपल्याकडे असल्याचे सांगितले.

मुख्य यंत्रणेशी संपर्क
या वेळी बोलताना इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हणाले की, ""ही मानवी रोबो अंतराळामध्ये मानवाला सहायक म्हणूनच काम करेल. वातावरण चांगले आहे की नाही, हे तपासण्याबरोबरच मुख्य "एनव्हायरोन्मेंट कंट्रोल लाइफ सपोर्ट सिस्टीम'च्या संपर्कातदेखील ही रोबो असेल. मानवी अंतराळवीरांप्रमाणेच ही रोबो काम करू शकेल.''

तत्पूर्वी याच परिषदेच्या उद्‌घाटन समारंभामध्ये बोलताना सिवन यांनी काही नव्या अंतराळ मोहिमांचीही घोषणा केली. डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्येदेखील भारताने काही मानवविरहीत मोहिमांचे आयोजन केले आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vyom Mitra, the humanoid for Gaganyaan has been unveiled