बंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातून भाजप नेत्यांच्या फौजा आल्या असतानाही तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकटीच्या बळावर पश्‍चिम बंगालमध्ये केवळ आपला गड राखलाच नाही, तर विरोधकांचा साफ धुव्वा उडवला.

बंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले?

कोलकता : शटल सेवा असावी त्याप्रमाणे दररोज राज्यात येत भाजप नेत्यांनी निवडणूकीचा प्रचार केला असला तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे देदिप्यमान विजय संपादन केला. तुल्यबळ लढत असे चित्र रंगविलेली ही निवडणुक प्रत्यक्षात ममता यांनी एकतर्फी ठरविली. जनतेची बंगाली अस्मिता जागृत करत त्यांनी ध्रुवीकरणाला शह दिला.

भाजपच्या प्रचाराची तोफ धडाडत असतानाही ममता यांनी, सर्व २९४ मतदारसंघात मीच उमेदवार असल्याचा प्रचार केल्याने त्याची फळे विजयाच्या रुपाने त्यांना मिळाली. तृणमूल अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करत असल्याचा आरोप करत भाजपने हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला. मात्र, अल्पसंख्याकांची मते मिळवितानाच उदारमतवादी हिंदूंची मते मिळविण्यात तृणमूलला यश आले. ममता यांनीही मंदिरांना भेटी देत आणि सभेमध्ये श्‍लोकांचे पठन करत आपली हिंदू ओळख निर्माण करत सौम्य हिंदुत्वाचा आधार घेतला. हिंदुत्वावर भर दिलेल्या भाजपने उदारमतवाद्यांबरोबरच भाकप (मार्क्सवादी-लेनिनवादी) या नक्षलसमर्थक पक्षाच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण केल्याने हे लोक उघडपणे ममतांच्या पाठिशी उभे राहिले.

हेही वाचा: बंगालमध्ये ममतांचीच ‘दीदी’गिरी

अभिषेक यांना फायदा

तृणमूलच्या विजयाचा ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनाही फायदा होणार असून त्यांना नेता म्हणून प्रस्थापित करण्यात तृणमूल काँग्रेसला अडचण येणार नाही. प्रचारातही ते आघाडीवर होते. भाजपने अनेक आयारामांना स्थान दिल्याने त्यांची विश्‍वासार्हताही धोक्यात आली आहे.

भाजपचे यश झाकोळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातून भाजप नेत्यांच्या फौजा आल्या असतानाही तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी एकटीच्या बळावर पश्‍चिम बंगालमध्ये केवळ आपला गड राखलाच नाही, तर विरोधकांचा साफ धुव्वा उडवला. राज्यात भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी तृणमूलच्या लखलखीत विजयाने त्यांचे ते यश झाकोळून गेले आहे. डावे पक्ष, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्या संयुक्त मोर्चा तर पराभवाच्या आणखी खोल गर्तेत गेला.

हेही वाचा: अग्रलेख : भारतेर खेला आरंभ!

राज्यात विजय मिळाल्याने ममता बॅनर्जींच्या हाती सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता आली आहे. २०१६ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता तृणमूलने आपले यश राखले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या जागा तेवढ्याच राहिल्या. मोठा बदल भाजप, डावे पक्ष आणि काँग्रेसच्या जागांमध्ये झाला. गेल्या निवडणुकीच्या आधारावर प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत डावे पक्ष आणि काँग्रेस असणे अपेक्षित असताना भाजपने ही भूमिका निभावली आणि आता तोच प्रमुख विरोधी पक्ष झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

आत्मपरीक्षण आवश्‍यक : विजयवर्गीय

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेच आहे, आपल्या पक्षाला मात्र आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी कबुली भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी आज दिली. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या विजयवर्गीय यांनी दुपारी पराभव मान्य केला. ‘लोकांनी ममता दीदींनाच निवडले आहे. आम्हीही आत्मपरीक्षण करू. आमचे कोठे चुकले, संघटनात्मक त्रुटी होत्या का, राज्यासमोर पक्षाचा चेहरा नसल्याचा परिणाम झाला का, याची चर्चा करू,’ असे ते म्हणाले. या पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजयवर्गीय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत पक्षाच्या खराब कामगिरीची कारणे विचारली.

हेही वाचा: भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष : नेमका फायदा कुणाचा?

या मुद्द्यांनी तारले

कल्याणकारी योजना : ममता बँनर्जी यांनी कन्याश्री, स्वास्थ्य साथी हेल्थ कार्ड आणि रूपश्री अशा कल्याणकारी योजना आणल्याने त्याचा विजयाला मोठा हातभार लागला.

भाजपकडे चेहरा नसणे : मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे चेहराच नसणे आणि दिल्लीतील नेत्यांनी चालवलेली प्रचार मोहीम, या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

बंगालची लेक : ‘बंगालची लेक’ असा स्वत:चा प्रचार करत ममतांनी बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रचारात आणला.

पायाला फ्रॅक्चर : पायाला फ्रॅक्चर झाले असताना ममतांनी ज्या तडफेने व्हीलचेअरवरून प्रचार केला, त्याबद्दल त्यांच्या टीकाकारांनी त्यांचे कौतुक केले.

अल्पसंख्यांकांची मते : काँग्रेस, डावे पक्ष आणि पीर अब्दुस सिद्दिकी यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटने एकत्र येत आघाडी केली. मात्र, अल्पसंख्याकांनी मतविभाजन होऊ देऊ नये, याचा भाजपलाच फायदा होईल, असे ममतांनी केलेले आवाहन मतदारांनी मानले आणि सर्व मते त्यांच्या पारड्यात पडली.

नोटिसांचा फायदा : सक्तवसुली संचालनालय, सीबीआय यांनी तृणमूलच्या नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. निवडणूक आयोगाची कारवाई, यामुळे तृणमूलवर अन्याय होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली.

Web Title: West Bengal Assembly Election 2021 Reasons For Mamata Banerjees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top