esakal | West Bengal Election : अमित शहांच्या उपस्थितीत बैठक; नवे चेहरे आणण्याची भाजपची रणनीती
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आज झालेल्या निवडक नेत्यांच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष उपस्थिती लावली.

West Bengal Election : अमित शहांच्या उपस्थितीत बैठक; नवे चेहरे आणण्याची भाजपची रणनीती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली, ता. ४ : पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सारा जोर लावून तृणमूल कॉंग्रेसडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता प्रत्यक्ष उमेदवारांच्या नावांच्या निश्‍चिती प्रक्रियेला वेग दिला असून मुख्यतः युवक व नवे चेहरे आणि तारे तारकांना बंगाली जनतेसमोर आणण्याची रणनीती पक्षाने आखल्याची माहिती आहे. यासंदर्भात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आज झालेल्या निवडक नेत्यांच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष उपस्थिती लावली.

हेही वाचा - 'खिसियानी बिल्ली खंबा नोचे'; राहुल गांधींचा ‘म्हणी’तून भाजपवर निशाणा!
भाजपने यंदा केरळपेक्षाही पश्‍चिम बंगालवर जास्त जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका लवकरच सुरू होईल. भाजपच्या परिवर्तन यात्रांच्या समारोपानिमित्त होणाऱ्या मोदींच्या पहिल्या सभेला १० लाखांची गर्दी जमविण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मतांचा टक्का ४०.६ टक्‍क्‍यांवर गेला व जागाही १८ पर्यंत वाढल्या. त्यातून पक्षाचा उत्साह वाढला असून २०० पेक्षा जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. त्यातही २७ मार्च व १ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी भाजपने उमेदवारांची यादी निश्‍चित करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत बहुतांश उमेदवारांची नावे निश्‍चित होतील. तृणमूलची यादी उद्या जाहीर होणार असल्याने भाजप घाई करत असल्याचे दिसत आहे. निवडणुकीत अधिकाधिक युवा चेहरे व माजी मंत्री राजीव बॅनर्जी व सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलमधून आलेल्या आमदारांना तिकीट देण्याची भाजपची रणनीती आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम जागेवर १ एप्रिलला मतदान आहे. तेथे भाजप कोणाला उभे करणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. ममतादीदींचे एकेकाळचे उजवे हात असलेले मुकुल रॉय व सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलमधून आलेल्या अनेक आमदारांनी या जागेवर लढण्याची तीव्र इच्छा शहा यांच्याकडे व्यक्त केली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ते सध्या गोपीबल्लुपूरचे खासदार आहेत.
हेही वाचा - अमित शहांमुळे पुदुच्चेरीत मोठा राजकीय भूकंप; रंगास्वामींनी सोडली कमळाची साथ
भाजपचे ममतांविरोधात आयोगाकडे निवेदन
ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले. तृणमूलचे आमदार हमीदुल रहेमान यांनी "निवडणुकीनंतर पाहून घेऊ' अशी जाहीर धमकी दिली. त्याबद्दल त्यांना निवडणूक लढवायला बंदी घालावी, अशीही भाजपची मागणी आहे. आयोगाला निवेदन दिल्यावर पक्षाचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय म्हणाले, की ममतादीदी म्हणतात "खेळ होईल' (खेला होबे). खेळ म्हणजे काय? तर मतदान केंद्रे बळकावणे, मतदारांना धमक्‍या देणे व निष्पक्ष निवडणुकांत अडथळे आणण्यासाठी प्रचंड हिंसाचार करणे. आम्ही तृणमूलच्या याच खेळाबद्दल आयोगाला माहिती दिली आहे. राज्यात तृणमूलने १२५ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करून बेकायदा कब्जा केला आहे. या नियुक्‍त्या तातडीने रद्द व्हायला हव्यात.

loading image