
तृणमूल काँग्रेसमधील मंत्री सिद्दिकुल्लाह चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या लोकांना राष्ट्रीय राजमार्ग रोखून धरला होता.
कोलकाता- पश्चिम बंगालच्या (West Bengal) वर्धमान जिल्ह्यात कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनामुळे कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेऊन जाणारी ट्रक खूप वेळ रस्त्यावरच अडकून पडली होती. तृणमूल काँग्रेसचे मंत्री सिद्दिकुल्लाह चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या लोकांना राष्ट्रीय राजमार्ग रोखून धरला होता. त्यामुळे कोविड-19 लस घेऊन जाणारी विशेष गाडी अडकली होती. सूत्रांच्या हवाल्याने 'न्यूज 18'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
कोरोनाचं दुसरं वर्ष अधिक कठीण; WHO ने दिली खबरदारीची सूचना
पूर्व वर्धमान जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक भास्कर मुखोपाध्याय यांनी म्हटलं की, कोलकाताला नवी दिल्लीशी जोडणाऱ्या राजमार्गाच्या ग्लासी भागात आंदोलन सुरु होते. त्यामुळे रस्ता जाम झाला होता. कोरोना लस घेऊन जाणाऱ्या गाडीला पाच किलोमीटर दूर एका गावातून दुसऱ्या रस्त्याने पाठवावं लागलं.
'सच्चा समर्थक कायद्यांना फाट्यावर मारुन हिंसा करु शकत नाही'; ट्रम्प...
20 किलोमीटर व्हॅन झाली डायवर्ट
बिगर-अधिकारिक सूत्रांच्या दाव्यानुसार व्हॅनला 20 किलोमीटरपर्यंत डायवर्ट करुन राष्ट्रीय राजमार्गापर्यंत आणण्यात आले. पश्चिम बंगाल पोलिस यांच्याकडे लशीच्या व्हॅनच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. लस बांकुरा आणि पुरुलिया याठिकाणी पाठवली जात आहे.
कोलकातामधून निघालेल्या या व्हॅनने पूर्व वर्धमान जिल्ह्यातील आरोग्य कार्यालयात 31,500 लस पोहोचवले आणि त्यानंतर बांकुरा आणि पुरुलियामध्ये लशीचा पुरवठा केला जाणार होता. कोरोना लशीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. अनेक ठिकाणी ग्रीन कॉरीडोर उभारण्यात आले होते. तरीही निदर्शकांनी रस्ता अडवून धरल्याने व्हॅन पुढे जाण्यास अडचण आली.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना लस घेऊन जाणारी लस त्या मार्गावरुन येत असल्याची मला माहिती नव्हती. जेव्हा मला ही गोष्ट लक्षात आणून देण्यात आली की कोरोना लस घेऊन जाणारी व्हॅन या मार्गावरुन जाणार आहे, तेव्हा आम्ही रस्ता सोडून दिला. पण तोपर्यंत व्हॅन दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात आली होती, असं ते म्हणाले आहेत.