
स्थापना करणाऱ्या इंदिरा गांधींमुळेच JNU ला लागले होते टाळे
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारातील अनेक भिंतींवर ब्राह्मण व वैश्य जातींच्या विरोधात घोषणा लिहील्याचे प्रकरण तापले असून विद्यापीठ प्रशासनाने याच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
जेएनयूच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या (स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज) इमारतीतील भिंती काही जातींच्या विरोधातील घोषणांनी विद्रूप केल्याचे निदर्शनास आल्यावर दिल्लीतील विद्यापीठे व महाविद्यालयीन वर्तुळात तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
जेएनयूमध्ये झालेला हा वाद पहिला नसला तरी यापूर्वीही विद्यापीठात अनेक वाद झाले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 1969 साली झाली. 22 डिसेंबर 1966 रोजी भारतीय संसदेने विद्यापीठाच्या बांधकामाचा ठराव मंजूर केला. काँग्रेस राजवटीत स्थापन झालेल्या या विद्यापीठाने काँग्रेसच्या विचारसरणीला कधीच साथ दिली नाही. विद्यापीठात शिकणारे बहुतांश विद्यार्थी डाव्या विचारसरणीचे समर्थन करतात.
इंदिरा गांधींना कुलपती पदाचा राजीनामा द्यावा लागला :
इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा JNU ने त्याला कडाडून विरोध केला होता. त्यादरम्यान सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. सीताराम येचुरी यांनाही आणीबाणीच्या काळात अटक करण्यात आली होती. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या पण त्या JNU च्या कुलपती पदावर राहिल्या. सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली JNU मधील विद्यार्थ्यांचा एक गट इंदिरा गांधींना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेला आणि त्यांच्यासमोर एक पत्र वाचून दाखवले. ज्यात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणीबाणीच्या काळात काय चूक झाली होती, हे त्या पत्रात सांगितले होते. त्यांनी कुलपतीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आणि त्यामुळे इंदिरा गांधींना राजीनामा द्यावा लागला होता.
जेएनयू 46 दिवस बंद :
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, JNU स्थापने नंतरच्या 12 वर्षांनंतर 16 नोव्हेंबर 1980 ते 3 जानेवारी 1981 दरम्यान 46 दिवस बंद होते. जेम्स जी. राजन नावाच्या विद्यार्थ्याने कार्यवाहक कुलगुरूंचा अपमान केला होता. इंदिरा गांधींनी JNU मधील गुंडगिरी रोखण्यासाठी वसतिगृहांवर छापे टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. यावेळी राजनजी जेम्स याला अटक करण्यात आली. त्यानंतर 46 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्यात आले.
2000 मध्ये, कवयित्री फहमिदा रियाझ आणि कवी अहमद फराज यांना जेएनयूमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांनी विरोध केला. पाकिस्तानच्या शायरांकडून युद्धाविरुद्ध गायल्या जाणाऱ्या नझमच्या विरोधात लष्कराचे अधिकारी होते. लष्करी अधिकाऱ्यांनी मुशायरा रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही विद्यार्थ्यांनी त्यांना मारहाण केली.
2016 मध्ये अफझल गुरूला फाशी देण्यावरून वाद :
2016 मध्ये जेएनयूमध्ये अफझल गुरूच्या फाशीविरोधात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कथितरित्या भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. ज्याला अभाविपने विरोध केला. याप्रकरणी जेएनयूचे अध्यक्ष कन्हैया कुमारलाही अटक करण्यात आली होती. मात्र, तब्बल साडेतीन वर्षे उलटून गेल्यानंतरही याप्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाहीत.