राहुल गांधी म्हणाले, कधीच माफी मागणार नाही

सकाळ न्यूजनेटवर्क
शनिवार, 14 डिसेंबर 2019

भाजपला डिवचले
या गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधींनी ‘माफी मागण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही,’ अशी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली. ‘मेक इन इंडिया’ होईल असे मोदींनी म्हटल्यामुळे सर्वत्र हेच दिसेल असे वाटले होते; परंतु दुर्दैवाने ‘मेक इन इंडिया’ होत नसून, बघावे तेथे ‘रेप इन इंडिया’ दिसते. भाजपशासित असे एकही राज्य नाही जेथे महिलांवर बलात्कार होत नसेल. अर्थव्यवस्था भारताचे बलस्थान होते; परंतु अमेरिका, युरोपमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची नव्हे तर अत्याचार, भेदभाव, हिंसा याबद्दलची चर्चा होते आहे. भारताची प्रतिष्ठा मोदींनी उद्‌ध्वस्त केली असल्याचे मुद्दे मी भाषणात उपस्थित केले होते. त्यामुळे मी कधीच माफी मागणार नाही, असे राहुल म्हणाले. सोबतच पेटलेला ईशान्य भारत, अर्थव्यवस्थेबद्दल आणि दिल्लीला बलात्काराची राजधानी म्हटल्याबद्दल मोदींनीच माफी मागावी, असे ट्विट करून राहुल गांधींनी भाजपला डिवचले.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या वादग्रस्त ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपाला गदारोळाचे गालबोट लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राहुल गांधींनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपने लोकसभेत जोरदार गोंधळ घातला. मात्र, राहुल गांधींनी वक्तव्यावर ठाम राहताना माफी मागणार नसल्याचे सुनावले. तसेच दिल्ली बलात्काराची राजधानी म्हटल्याच्या वक्तव्याची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले. 

पंकजा मुंडेवर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले...

झारखंडच्या गोड्डा येथील सभेत राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’ऐवजी ‘रेप इन इंडिया’ बनल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचे संतप्त पडसाद लोकसभेत उमटले. मंत्री स्मृती इराणी, प. बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ‘रेप इन इंडिया’ असे बोलून राहुल गांधी बलात्काराऱ्यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण देत आहेत.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

हा महिलांचा, भारत मातेचा अपमान आहे, असा हल्ला लॉकेट चटर्जी यांनी चढवला, तर स्मृती इराणी यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होते आहे की गांधी कुटुंबातील राहुल गांधी देशातील महिलांवर बलात्कारासाठी सार्वजनिक आवाहन करत आहेत. भाजपचे खासदार व मुख्य प्रतोद संजय जायस्वाल यांनी ‘विदेशी मातेचा पुत्र राष्ट्रभक्त असूच शकत नाही,’ या चाणक्‍य वचनाचा अर्थ राहुल गांधींच्या राजकारणातून स्पष्ट होतो, असे बोलून या वादात आणखी भर टाकली. 

एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर... : बाळासाहेब थोरात

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधी बेजबाबदार नेते असल्याचा आरोप केला. राहुल यांना भान नसले तरी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भान बाळगून माफी मागतील, अशी आशा आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will never apologize rahul gandhi