esakal | ‘जी-२३’ मधील नेत्यांची नाराजी दूर करणार
sakal

बोलून बातमी शोधा

sonia gandhi and rahul gandhi

‘जी-२३’ मधील नेत्यांची नाराजी दूर करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कॉंग्रेस संघटनेमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काही उपाध्यक्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच विद्यमान प्रभारी सरचिटणीसांच्या पातळीवरही बदल अपेक्षित आहे. यात नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संघटनेत स्थान देताना, फेरबदलामध्ये असंतुष्टांनाही शांत केले जाणार असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी जी-२३ मधील काही नेत्यांना देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील, असे कळते.

हेही वाचा: उत्तराखंडच्या राज्यपाल बेबीराणी मौर्य यांचा राजीनामा

कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा मुद्दा कोरोना काळामध्ये पुन्हा चर्चेला आला असला तरी सर्वोच्च नेतृत्वाच्या पातळीवर बदल होणार नसल्याचे कळते. राहुल गांधींची अध्यक्षपद स्वीकारण्याची अद्याप तयारी नाही. युवक काँग्रेसने याबाबतचा ठराव मंजूर केल्याने राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, राहुल यांच्या नेतृत्वाबाबत पक्षात नसलेली एकवाक्यता आणि राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या एकजुटीसाठी राहुल यांच्या नेतृत्वामध्ये आश्वासकतेचा असलेला अभाव पाहता तूर्तास सोनिया गांधींनीच कॉंग्रेस अध्यक्ष राहावे आणि राहुल गांधींनी अन्य पक्षांमध्ये आपली स्वीकारार्हता वाढवावी, असा युक्तिवाद पुढे येत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपासून ते थेट लोकसभा निवडणुकीपर्यंत टप्प्या टप्प्याने निवडणूक हंगाम चालणार आहे. या परिस्थितीमध्ये भाजपविरोधात समर्थ पर्याय उभा करण्यासाठी कॉंग्रेस संघटनेतबदलांची मागणी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर, संघटनात्मक कामकाजाच्या सोयीसाठी काही विभागांमध्ये विभागणी करून त्यावर अनुभवी नेत्यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव पक्ष नेतृत्वासमोर आहे.

हेही वाचा: मंदिरांच्या मालमत्तेचे देवच मालक;पाहा व्हिडिओ

चार उपाध्यक्ष असण्याची शक्यता

उपाध्यक्षांच्या संख्येबाबत स्पष्टता नसली तरी चार उपाध्यक्ष असू शकतात असे बोलले जात आहे. तसेच प्रभारी सरचिटणीसांच्या पातळीवर देखील व्यापक बदल होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये राज्यांचे प्रभारी सरचिटणीस यांनी राज्यांमध्ये थांबून संघटना बांधणीवर लक्ष द्यावे आणि उपाध्यक्षांमार्फत अध्यक्षांच्या संपर्कात राहणे अपेक्षित असल्याचे समजते. या फेरबदलांमध्ये निष्क्रीय प्रभारींना हटविले जाणार असून नवी जबाबदारी सोपविली जाणार आहे. जी-२३ मधील असंतुष्टांना चुचकारण्याचाही प्रयत्न होणार आहे.

नाराजांना फेरबदलात योग्य स्थान

असंतुष्ट नेत्यांचे नेतृत्व करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना कोरोनावरील उपायोजनांशी संबंधित समितीचे नेतृत्वपद, स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसाठी कॉंग्रेसच्या समितीमध्ये आझाद यांना स्थान देण्यात आले. यासोबतच जी-२३ गटातले मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांनाही शांत करण्यात आले आहे. अन्य नाराजांनाही फेरबदलामध्ये योग्य स्थान देऊन मधाचे बोट लावले जाईल. मात्र टीकास्त्र सोडणाऱ्या बंडखोरांना या फेरबदलांमधून योग्य तो इशारा दिला जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: आसाम : ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची टक्कर; एकाचा मृत्यू, ७० बेपत्ता

तीन राज्यांची डोकेदुखी

कॉंग्रेसकडे असलेल्या तीन राज्यांमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर सरकार अस्थिर होण्याच्या प्रकाराने गांधी कुटुंबीयांच्या पातळीवर चिंता वाढली आहे. राजस्थानमधील गेहलोत- पायलट वाद शांत झालेला नाही. तर पंजाबमध्ये सिद्धू-अमरिंदरसिंग वाद आणि नेतृत्वाची उदासीनता यामुळे प्रभारी हरीश रावत यांनी कंटाळून पद सोडण्याची तयारी दर्शविली आहे. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल विरुद्ध त्यांचे मंत्री टी. एस. सिंहदेव यांच्यातील कुस्ती तुर्तास बंद झाली असली तरी संघर्ष केव्हाही उफाळण्याची शक्यता आहे.

loading image
go to top