

India’s Birth Rate Drops: World Population Day 2026
esakal
India’s Fertility Rate Hits Danger Zone: आज ११ जुलै म्हणजेच 'जागतिक लोकसंख्या दिन'. भारत आज जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून उभा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UNFPA) अहवालानुसार, भारताची लोकसंख्या सुमारे १४६.३९ कोटींवर पोहोचली आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी भारताच्या वाट्याला २.४ टक्के भाग आला आहे; पण जगातील जवळपास १७.८ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते. ही अथांग लोकसंख्या भारतासाठी जितकी मोठी संधी आहे, तितकेच ते एक मोठे आव्हानही बनले आहे.
नमुना नोंदणी प्रणालीच्या (SRS) ताज्या अहवालानुसार, भारताचा एकूण प्रजनन दर (TFR) आता १.९ वर घसरला आहे. कोणतीही लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी हा दर २.१ असणे आवश्यक मानले जाते, ज्याला 'प्रतिस्थापन पातळी' (Replacement Level) म्हणतात.
मुलांचे महागलेले संगोपन, शिक्षण-आरोग्याचा खर्च आणि बदलती जीवनशैली यामुळे आता लोकांचा भर 'लहान कुटुंब' (एक किंवा दोन मुले) यावर वाढला आहे. जन्मदर इतक्या वेगाने घटत असल्यामुळे भविष्यात देशात तरुणांची संख्या कमी आणि वयस्कर लोकांची संख्या जास्त होईल, अशी चिंता जागतिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.