जागतिक चिमणी दिन : चिमण्यांची घटती संख्या मानवासाठी अधिक धोकादायक!

Sparrow
Sparrow

आज २० मार्च जागतिक चिमणी दिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये 'नेचर फॉरेव्हर सोसायटी' नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील इको-सीस अॅक्शन फाउंडेशन आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने २०१० पासून 'जागतिक चिमणी दिन' साजरा करण्यास सुरवात केली. पुढे २०११ पासून चिमणी या पक्ष्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था तसेच लोकांचा गौरव करण्याची प्रथा सुरू केली जी आजतागायत सुरू आहे. यंदा 'आय लव्ह स्पॅरो' ही थीम घेऊन जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे.

शहरी नव्हे तर ग्रामीण भागातूनही चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचे दिसून आले. त्यानंतर २०१० पासून दरवर्षी २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे. आपल्या उघड्या डोळ्यांना याची जाणीव होणार नाही, पण चिमण्यांचा अधिवास आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे त्याचा अभ्यास केल्यानंतर जाणवून येईल. 

चिमण्यांची संख्या कमी व्हायला वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणारे सिमेंटचे जंगल हे प्रमुख कारण आपण समजत असलो तरी अनेक छोटी-मोठी कारणे कारणीभूत आहेत. पूर्वी घराभोवती असणारी झाडे, परसबाग आणि वळचणीची जागा यामुळे चिमण्यांचा अधिवास मानवी वस्तीजवळ असायचा. तसेच गावातील तसेच शेतातील विहिरीजवळील बोर, बाभळीची झाडे ही चिमण्यांची राहण्याची आवडती जागा. चिमण्यांच्या चिवचिवाटानेच सकाळ व्हायची. घरातील लोक ज्वारी, बाजरी तसेच चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करून गोठ्याजवळ टाकायचे. त्यावर चिमण्या ताव मारायच्या. मात्र, जसजसे माणूस विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला तसतसे हे चित्र बदलत गेले. झाडांची संख्या कमी झाली. कौलारू घरे, झोपड्यांच्या जागी आता सिमेंटची घरे आले. त्यामुळे वळचणीच्या जागा नाहीशा झाल्या. बोरी-बाभळींच्या झाडांच्या जागी आता मोबाईल टॉवर उभा राहिले. 

परिणामी, चिमण्यांच्या घरावर अतिक्रमण झाले. तरीही मानवी वस्तीच्या आसपास राहण्याच्या सवयीमुळे चिमण्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, गेल्या १५-२० वर्षाच्या कालखंडात चिमण्यांच्या संख्येत सुमारे ८५ टक्के एवढी प्रचंड मोठी घट झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या तरंगलहरींचा चिमण्यांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होत आहे. तसेच वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि झाडांची कमी होत चाललेल्या संख्येमुळे चिमणी परिपक्व अंडी देऊ शकत नाही. सिमेंटची घरे वाढल्याने चिमणीचे घरटेही बदलले आहे. त्यामुळे त्या अंड्याला पुरेसे तापमान मिळू शकत नाही. पिलाला जन्म देण्यासाठी हवी असणारी नैसर्गिक घरट्याची उब चिमणी पुरवू शकत नाही. या सर्व संकटांचा सामना करत जे पिल्लू जन्माला येते त्याची नैसर्गिक वाढ म्हणावी तशी होत नाही. तरीही चिमणी सभोवतालच्या वातावरणानुसार स्वत:ला अॅडजस्ट करून घेत आहे.  

दरम्यान, गुजरातच्या गांधीनगर येथे १३ वी संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषद पार पडली. या परिषदेमध्ये भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील अहवाल प्रकाशित करण्यात आला. ज्यामध्ये पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे गेल्या २५ वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी घट नोंदविली गेल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९ टक्के घट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरुपात असल्याचे आढळून आले आहे. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींना मोठ्या प्रमाणात संवर्धनाची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे. चिमण्यांच्या संवर्धनासाठी आधीच खूप उशीर झाला आहे. मात्र, आताही यासाठी काही पावले उचचली तरी चिमण्यांच्या संख्येत येत्या काही वर्षात वाढ झाल्याचे दिसून येईल. नाहीतर चिमणी दिसायला सामान्य आणि आकाराने छोटा पक्षी, असं काहीसं वर्णन आपल्या पुढच्या पिढीला करून द्यावं लागेल.

गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती :

- पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर)
- रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट)
- भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर)
- सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर)
- बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com