तुम्हाला तुमचे उत्पादन विकायचंय?... मग आता चिंता सोडा!

Online-Platforms
Online-Platforms

तुम्ही खास उत्पादनाचे उत्पादन करणारे छोटे उद्योजक असाल, तर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे ‘मी हे उत्पादन कुठे विकू शकेन?’ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबीयांना विचारले, तर तिथूनही बहुतेक वेळा येणारे कॉमन उत्तर म्हणजे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट हेच असते; पण ही स्थिती का आली बरे? याचे एक कारण म्हणजे या दोन वेबसाइट्सचा असलेला सगळ्यांत जास्त प्रभाव. फ्लिपकार्टचे दहा कोटी ग्राहक आहेत, रोज एक कोटी लोक या वेबसाइटला भेट देतात आणि तिचे नेटवर्क एक हजारपेक्षाही जास्त शहरांत पसरलेले आहे आणि हे आकडे वाढतच आहेत. ॲमेझॉन तर याच्या तुलनेत किती तरी पुढे आहे. छोटे उद्योजक यांमुळे प्रभावित होतात-कारण त्यांची उत्पादने प्रचंड मोठ्या ग्राहकवर्गाकडून बघितली जातात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, विक्रेते या दोन वेबसाइट्स निवडतात त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा पसारा एवढे एकच कारण नाही. या दोन्ही कंपन्यांनी असा ब्रँड तयार केला आहे-जो ग्राहक आणि विक्रेते या दोघांच्या दृष्टीने विश्वासार्ह आहे. दोन्ही कंपन्यांनी विक्रेत्यांबाबत नियमसंहिता तयार केल्या आहेत- ज्यांचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीपासून वस्तू पोचवण्याबाबतच्या त्रुटींपर्यंत सगळ्या प्रकारच्या उणिवांबाबत चौकशी केली जाते. या विक्रेत्यांना पैसे मिळण्याची वाट बघत बसायला लागू नये यासाठी ऑर्डरच्या तारखेनंतर विक्रेते किंवा व्यापाऱ्यांना सात ते पंधरा दिवसांच्या आत पेमेंटची गॅरंटीही ते देतात. अशा प्रकारच्या नियमसंहिता असल्यामुळे उदयोन्मुख उद्योजकाला अनावश्यक वेस्टेजेस, खर्च किंवा अडलेल्या रकमा वगैरेंबाबत चिंता करायची गरज पडत नाही. 

आणखी पुढची गोष्ट म्हणजे छोट्या उद्योजकांची उत्पादने विकण्याची प्रक्रियाही दोन्ही कंपन्यांनी सोपी ठेवली आहे. विक्रेत्यांसाठी माल पोचता करण्याची प्रक्रिया अडथळेविरहित ठेवण्याचा प्रयत्न हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स करतात. ग्राहकाने प्लेस केलेल्या ऑर्डरबाबत विक्रेत्याला लगेच सूचना मिळण्याबाबत फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनकडे योग्य सिस्टिम्स आहेत आणि त्यांची माणसे थेट विक्रेत्याकडून माल घेऊन जातात. ते यासाठी थोडे कमिशन किंवा फी आकारत असले, तरी विक्रेत्याचा वेळ, पैसा आणि कष्ट वाचतात- जे अलीकडच्या काळात व्यवसाय चालवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. फ्लिपकार्टवर तुमचे उत्पादन लिस्ट करण्यासाठी एक रुपयाही लागत नाही. याचा अर्थ अगदी विक्रेत्याला त्याचे उत्पादन कशी कामगिरी करेल याचा समजा अंदाज जरी नसला, तरी त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही.

पूर्णतया नवीन उत्पादन असेल, तर ॲमेझॉन छोटी फी (चाळीस डॉलर) आकारते. मात्र, एकूण मोठ्या व्यापाचा विचार करता ही फी अगदीच किरकोळ आहे. अर्थात एक गोष्ट इथे आवर्जून नोंदवायला पाहिजे, की लिंस्टिंग शुल्क नसले, किंवा कमी असले तरी दोन्ही कंपन्या विकल्या जाणाऱ्या उत्पादनावर मात्र फी किंवा कमिशन आकारतात. मार्केटप्लेस फी आणि जीएसटी यांसारख्या काही फी निश्चित असल्या, तरी इतर फी या त्या त्या वस्तूचं वजन, तिची कॅटेगरी वगैरे गोष्टींनुसार बदलतात. या फी तुलनेनं जास्त वाटत असल्या, तरी तुमचे उत्पादन प्रत्यक्ष विकले जाते तेव्हाच त्या आकारल्या जात असल्याने उद्योग चालवण्याचा खर्च म्हणूनच त्यांच्याकडे बघितले पाहिजे.
विक्रेत्यांना बळ देण्यासाठी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणखी एक गोष्ट करतात ते म्हणजे त्या त्यांच्यासाठी विविध सेवा सवलतीत उपलब्ध करून देतात. उत्‍पादने अतिशय व्यावसायिक दर्जाची आणि आकर्षक दिसावीत यासाठी त्यांचे योग्य फोटो आणि तपशील योग्य प्रकारे देण्यासाठी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन्ही कंपन्या विक्रेत्यांना कॅटलॉगिंग सेवा उपलब्ध करून देतात. याच्या बरोबरीने ॲमेझॉनकडे पॅकेजिंग साधने, अकाऊंटिंग सेवा यांच्यासंदर्भातले थर्ड पार्टी नेटवर्कही आहे आणि ॲमेझॉन इन्कमवर टॅक्स-डाक्युमेंटेशन सेवाही उपलब्ध आहे. या सगळ्या नेटवर्कशी जोडले जाण्याने आणि सेवांच्या व्यापक पटामुळे या केवळ एकाच प्लॅटफॉर्मचा वापर करून छोटे व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाचे स्थान उंचावू शकतात.

विशेषतः ॲमेझॉनवर आणखी एक उत्तम सुविधा आहे-जी छोट्या व्यावसायिकांना महत्त्वाची वाटू शकते ती म्हणजे सेलर रिवॉर्ड्‌स प्रोग्रॅम. विक्रेत्यांनी त्यांची उत्पादने विकण्यासाठी ॲमेझॉनची निवड केल्याबद्दल ॲमेझॉन काही फायदे नियमितपणे उपलब्ध करून देते. हे फायदे रोख इन्सेन्टिव्ह, सवलती किंवा अगदी मोफत अतिरिक्त सेवांच्या कोणत्याही स्वरूपात असू शकतात. अशा प्रकारची कोणतीही अतिरिक्त मदत विशेषतः नवीन व्यवसायांना किंवा उद्योगांना त्यांचा विस्तार होण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने अशा नवीन व्यवसायांना हा प्रोग्रॅम प्रोत्साहन देणारा आहे.

नोंदणी अगदी सोपी

  • जीएसटीआयएन नंबर
  • कंपनी पॅन कार्ड
  • बँक अकाऊंट आणि केवायसी तपशील
  • विक्रेते त्यांचे अकाऊंट तयार करू शकतात, उत्पादनांचे लिस्टिंग करून लगेच ऑर्डर मिळवणे सुरू करू शकतात. 

ऑनलाइनचे किती तरी पर्याय
ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सोडून इतर कोणत्या ऑनलाइन ठिकाणी तुम्ही तुमच्या उत्पादनांची विक्री करू शकता?

  • स्वतःचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, बाजारपेठ तयार करण्यासाठी : शॉपिफाय
  • मल्टिकॅटेगरीअसलेले इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स : अलिबाबा, स्नॅपडील 

गरजा अन् ओळखा निवड करा!
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ही मोठी नावे असली, तरी इतर पर्याय नाहीत असे नाही. विक्रेते अलिबाबा, जिओमार्ट, स्नॅपडील इत्यादी ई-कॉमर्स साइट्सचा पर्याय निवडू शकतात- ज्या साधारण अशाच सेवा उपलब्ध करून देतात. उत्पादने विशिष्ट बाजारपेठेपुरतीच मर्यादित हवी असल्यास निका, मिन्त्रा अशा विशेष वेबसाइट्सची निवड करू शकतात. मुरलेले उद्योजक शॉपिफायसारख्या साधनांची मदत घेऊन स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइटसुद्धा तयार करू शकतात. जे व्यवसायात खूपच नवीन आहेत ते फेसबुक मार्केटप्लेस किंवा ई-बेसारख्या स्थानिक व्यवहार करणाऱ्या बाजारपेठांची निवड करू शकतात.

विशिष्ट उत्पादन किंवा उद्योग असलेले इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स 

  • मिन्त्रा : फॅशन/लाइफस्टाइल
  • इंडियामार्ट : बी२बी
  • बुकमायशो : तिकीटविक्री
  • निका : सौंदर्य
  • फर्स्टक्राय : छोटी मुले/बालके
  • १ एमजी : औषधविक्री
  • स्थानिक खरेदी-विक्री आधारित बाजारपेठा : फेसबुक मार्केटप्लेस, ई-बे, क्विकर इत्यादी.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com