
बेंगळुरु - सध्या काही खरेदी करायची झाली तर बऱ्याचदा ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडला जातो. अगदी खाद्यपदार्थसुद्धा ऑनलाइन मागवले जातात. एका तरुणीनं असंच ऑनलाइन जेवण मागवलं होतं. मात्र काही कारणाने तिनं ऑर्डर रद्द केली आणि त्याचा फटका तिला विचित्र पद्धतीनं बसला. तरुणीने झोमॅटो अॅपवरून जेवण ऑर्डर केलं होतं.
ऑनलाइन जेवण मागवल्यानंतर ठराविक वेळेत जेवण आलं नाही. त्यामुळे तरुणीने ऑर्डर रद्द केली. तरीही थोड्या वेळात डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन तरुणीच्या घरी आला. त्यावेळी तरुणीने ऑर्डर रद्द केल्याचं सांगत जेवण घेण्यासाठी नकार दिला. तरुणीनं जेवण घेणार नाही असं सांगितल्यानं रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयने तिच्या नाकावर बुक्की मारली.
अचानक डिलिव्हरी बॉयने मारलेल्या बुक्कीमुळे तरुणीच्या नाकातून रक्त यायला लागलं. तेव्हा तरुणीनं घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि आजुबाजुच्या लोकांना याबाबत सांगितलं. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराचं वर्णन केलं आहे. ऑर्डर वेळेत आली नाही तेव्हा कंपनीच्या कस्टमर केअरला याबाबत माहिती दिली होती. तसंच ऑर्डरसुद्धा रद्द केली होती. कस्टमर केअरसोबत बोलणं सुरु असताना डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन दरवाजात आला होता. दरवाजा अर्धवट उघडून जेवण घेणार नसल्याची माहिती दिली होती. डिलिव्हरी बॉयनं वाद घालायला सुरुवात केली. पण तरीही त्यानं घरात येऊन जेवण आत ठेवलं. त्यावेळी विरोध करताच मी तुमचा नोकर आहे का असं विचारत नाकावर जोराने प्रहार केला असं तरुणी म्हणते.
डिलिव्हरी बॉयनं मारल्यानंतर मदतीसाठी कोणीच पुढं आलं नाही असंही तरुणीने म्हटलं आहे. तेव्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतले आणि सध्या काहीच बोलण्याची स्थिती नाहीय. बेंगळुरु पोलिसांनी मदत केली असून मारहाण करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे असंही तिने सांगितलं.
दरम्यान, झाल्या प्रकाराबद्दल झोमॅटोनं स्पष्टीकरण दिलं असून कंपनीने तरुणीची माफी मागितली आहे. स्थानिक अधिकारी तरुणीशी संपर्क साधतील आणि पोलिस तपासासह इतर मदत करतील. तसंच संबंधित डिलिव्हरी बॉयवर कंपनीकडून कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.