
इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग: काल, आज आणि उद्या
आजकालच्या युवा पिढीपुढे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, करिअर! अभियांत्रिकी जगतात दहावी किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्याला जर विचारले, तर बहुतांशी मुलांचे उत्तर फक्त संगणक अभियांत्रिकी हेच असते. जर आपण त्यांना विचारलं, की हेच का? तर कोणाकडेही ठाम उत्तर नसते. आपल्या समाजाला वारा वाहील तसं वहायला आवडतं. गेल्या वीस-एक वर्षांच्या माझ्या पाहणीतून असे दिसते की हा ट्रेंड दर काही वर्षांनी बदलतो व याला कोणतेही शास्रीय परिमाण नाही.
अभियांत्रिकी जगात सर्वप्रथम फक्त बेसिक शाखा या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व सिव्हिल या होत्या. जशी शाखेची प्रगती होत गेली तशा नविन नविन शाखांची निर्मिती झाली. अजूनही आय. आय. टी. मध्ये इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर या शाखा त्यांचा मूळ शाखेत म्हणजे इलेक्ट्रिकल शाखेत आहेत.
आजच्या जगात जर आपण नोकरीच्या विविध संधी बघितल्या तर असे दिसून येईल की, कॉम्पुटर इंजिनिअर्स बरोबरीने बाकी सर्व शाखांमधील विद्यार्थी हे सॉफ्टवेअर जॉब्स मध्ये चांगले प्राविण्य मिळवत आहेत. पण काही विशिष्ट जॉब्समध्ये अभियांत्रिकेचे ज्ञान हे जास्त गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर आपण मायक्रो-ग्रीडचे काम पहिले तर सॉफ्टवेअर बरोबरच इलेक्ट्रिकल शाखेचे ज्ञान हे जास्त गरजेचे आहे. याचाच अर्थ मल्टिडिसिप्लिनरी शाखांमध्ये नोकरीच्या संधी जास्त असतील.
जसं शेअर मार्केटमध्ये पुढील काही वर्षांचा आढावा घेतल्यास आपल्याला जास्त मोबदला मिळतो तसं आपल्या करियर मध्ये आपण पुढे काय काय आणि कुठे कुठे प्रगती होणार आहे याचा आढावा घ्यावा लागेल. आजचं जग हे मुखत्वे तीन गोष्टींवर अवलंबून आहे, ते म्हणजे रिड्युस, री-यूझ आणि रिसायकल... आज जगामध्ये एनर्जीची कमतरता, त्याचा प्रभावी वापर यावर भरपूर संशोधन चालू आहे. येणाऱ्या काळात आजची जुनी डिझेल पेट्रोल इंजिन्स जाऊन नवीन इलेक्ट्रिक इंजिन्स येत आहेत. हा बदल नक्कीच खूप मोठ्या संधींना वाव देणारा ठरणार आहे. येत्या काही वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत भारतातील जुनी वाहने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक होतील. या सर्व वाहनांसाठी प्रचंड मोठी चार्जिंग स्टेशन्स उभी होणार आहेत. नवीन नवीन उद्योग निर्मिती चालू झाली आहे त्या मध्ये मुख्यत्त्वे बॅटरी व त्याच्या सॉफ्टवेअर साठी लागणारी विविध उपकरणे येतात.
आजच्या इलेक्ट्रिकल विश्वात रिन्यूएबल एनर्जी शाखेत प्रचंड संधी चालून आलेल्या आहेत. मग त्यात सोलर एनर्जी असो किंवा विंड एनर्जी असो यावर भरपूर संशोधन चालू आहे. उत्तरांचल सारख्या अतिदुर्गम ठिकाणी सुद्धा किती तरी छोटे छोटे जलविद्युत प्रोजेक्ट्स उदयाला आले आहेत. साध्या छोट्या धबधब्यापासून सुद्धा वीज मिळू शकते आणि याची आजच्या काळात असलेली गरज फार महत्वाची आहे. विद्युत स्वावलंबी घरे हीच उद्याची गरज असेल. यासाठी आजच्या रिन्यूएबल एनर्जीच्या जगतात विविध संशोधन चालू आहे, मग ते भरती ओहोटीपासून वीज निर्मिती किंवा समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती असो, अशी अनेक संशोधनं चालू आहेत. आजची गरज ही वीजनिर्मिती बरोबरच तीची साठवण कशी करायची ही आहे. मोठमोठ्या बंगाल्यांएवढ्या बॅटरी बँकची निर्मिती असो किंवा जमिनी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साठवलेली उच्चदाबाची हवा असो किंवा एखाद्या ट्रेन वरून उंच डोंगरांवर साठवलेले सिमेंटचे ब्लॉक असो जे गरजेच्या वेळी पुन्हा खाली आणून त्या पासून वीज निर्मिती असो असे अनेक प्रयोग चालू आहेत आणि या सर्वां साठी लागणारी मल्टिडिसिप्लिनरी कुशल इंजिनिअर्स हीच काळाची गरज असेल.
आज आपण बघतोच आहे की, अद्ययावत कारमध्ये कितीतरी सेंन्सर्स लावलेले असतात. आजचे जग हे इंटरनेटचे जग आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे विद्युत यांत्रिकी ची एक नवी शाखा ‘आय. ओ. टी.’ म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्जस आहे. येणाऱ्या काळात एका साध्या घरात कित्येक सेन्सर्स वापरून ऑटोमेशन असेल. एका मोबाईलच्या क्लीक वर आपण काहीही करू शकू. हे तंत्रज्ञान आता नवीन नाही. हेच उद्याचे नवीन तंत्रज्ञान असेल. आजच्या पिढीने हे संगणक सॉफ्टवेअर बरोबरच इलेक्ट्रिकल शाखेचे ज्ञान अवगत केलं पाहीजे.
आज विदयुत व कॉम्प्युटर अभियांत्रिकीमध्ये रिन्यूएबल एनर्जी, आय. ओ. टी., ई वेहीकल बरोबरच रोबोटिक्स व ऑटोमेशन, ट्रान्समिशन व डिस्ट्रिब्युशन तसेच विविध कॉम्पुटर शाखेतील विषय म्हणजेच आर्टिफिशल इंटीलिजन्स, मशिन लर्निंग व शासकीय क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
आजच्या काळात केवळ अभियांत्रिकेच्या एका शाखेवर जास्त लक्ष ठेऊन चालणार नाही. आजचं जग हे कोणतीच शाखा मानणारं नसून सर्वाना मल्टिडिसिप्लिनरी काम करावं लागेल. संगणक सॉफ्टवेअर बरोबरच मूलभूत शाखा मग त्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा सिव्हिल असो यांना काही दिवसात जास्त महत्व येणार आहे. म्हणूनच विदयुत व कॉम्प्युटर अभियांत्रिकीमध्ये करीयर हे एक वैविध्यपूर्ण व नवीन युगाची आस धरणारे क्षेत्र नक्कीच सफलता मिळवून देईल.
- डॉ. साकेत येवलेकर,
असोसिएट प्रोफेसर, विद्युत यांत्रिकी,
एम. आय. टी. विश्वशांती विद्यापीठ, पुणे.