करिअरचा प्रश्न पडलाय? वाचा प्रिंटिंग इंजिनिअरिंगमधील संधी

Printing
Printing

शिक्षण झाल्यानंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हा प्रश्न असतो. बऱ्याचदा करिअर मार्गदर्शन करणाऱ्यांकडून अनेक पर्याय सुचवले जातात. त्यातही वेगवेगळे ट्रेंड असतात आणि विद्यार्थी गोंधळून जातात. इंजिनिअरिंग करणाऱ्यांसाठी प्रिंटींग इंजिनिअरिंग हा वेगळा आणि चांगला पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यात संधी काय आणि किती असतील याची काळजी असते. त्यामुळे सुरवातीला या क्षेत्रातील संधी बघू.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रिंटिंगमधील वर्गवारी
१. कमर्शिअल प्रिंटिंग - येथे लीफलेट, ब्रोशर, कॅटलॉग, वगैरेचे मुद्रण होते. ऑफसेट तंत्र वापरून ही छपाई केली जाते. यात नोकरी किंवा व्यवसाय संधी आहेत. बुक प्रिंटिंगदेखील याच तंत्राने केले जाते

२. पॅकेजिंग प्रिंटिंग -  हे  तीन वेगवेगळी तंत्र वापरून होते  व यात मध्यम ते मोठ्या देशी व बहुराष्ट्रीय कंपन्या देखील आहेत. आपली दिवसाची  सुरवात होते दूध पिशवी तसेच चहा पावडरच्या पाऊचने! यावर छपाई असते. टूथ पेस्ट, दाढीच्या क्रिमपासून प्रत्येक वस्तू छापलेली असते. त्यांच्या बॉक्सवर देखील छपाई असते यावरून पॅकेजिंग प्रिटिंगचे महत्त्व लक्षात येईल. फार्मा पॅकेजिंग, एफएमसीजी म्हणजे रोजच्या वापरातील वस्तूंचे पॅकेजिंग आणि फूड आणि  ब्रेव्हरेज पॅकेजिंग असे ढोबळ भाग पडतात.आपण घरी मागवतो त्या पिझ्झ्याच्या खोक्यावर देखील प्रिंटींग असतेच.

३. वर्तमान पत्र : भारतात साक्षरतेचा दर वाढताच आहे. त्यामुळे बातम्या मोबाईल फोनवर समजल्या तरी रोजचे वर्तमानपत्र वाचले जाईलच. वृत्तपत्र संस्था या मोठ्या ग्रुपच्या असतात. चांगल्या नोकरीच्या संधी तेथे उपलब्ध असतात.

४. डिजिटल प्रिंटिंग : मोठे होर्डिंग ते अगदी व्हिजिटिंग कार्डपर्यंत छपाई या तंत्राने केली जाते. तसेच स्पेशालिटी प्रिंटिंग देखील होते. प्रतींची छोटी संख्या किफायतशीर रीतीने या तंत्राने साध्य होते. छोट्या ते मध्यम गुंतवणुकीत यात व्यवसाय संधी नक्कीच आहे.

५. प्रिंटिंगसाठी लागणारा कच्चा माल उत्पादन करणाऱ्या कंपन्या : कागद, शाई, प्लेट्स, विविध रसायने व कोटिंग्ज यात अनेक देशी व बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत यांच्या उत्पादनामध्ये नोकरीची संधी मिळते.

६. प्रिंटिंग, प्रीप्रेस, फिनिशिंग मशिनरी : यात देखील जगविख्यात कंपन्या भारतात आहेत. तेथे मुख्यत्वे सेल्सचा जॉब मिळू शकतो.

७. प्रिंटिंग संबंधी सॉफ्टवेअर : या क्षेत्रात देखील भरपूर काम करायला वाव आहे. यात ऑपरेटर पातळीवर ट्रेनिंग हा मोठा भाग आहे.

८. टेक्निकल सपोर्ट : वरील वेगवेगळे प्रिंटिंगचे प्रकार, त्यात लागणारी मशिनरी, कच्चा माल यात सतत नवनवे संशोधन होत असते. ग्राहकाला नव्या तंत्रामध्ये मदत लागते, ऑपरेटर मंडळींना ट्रेनिंग द्यावे लागते. सॉफ्टवेअरमध्ये अशा तंत्रज्ञांची गरज भासते. या मध्ये खूप मागणी आहे. रोज नवे आव्हान ज्यांना आवडते त्यांनी जरूर या क्षेत्राकडे बघावे. मात्र, उत्तम टेक्निकल ज्ञान व कौशल्य असायलाच हवे.

९. सरकारी नोकरी : करन्सी नोट प्रेसपासून अनेक सरकारी मुद्रणालयात नोकरीची संधी वेळोवेळी प्रकाशित होत असतेच.

१०. प्रिंटिंगमध्ये भारतभर अनेक डिप्लोमा व इंजिनिअरिंग महाविद्यालये असून, नव्याने स्थापनही होत आहेत. त्यात लेक्चरर, प्रोफेसर म्हणून देखील काम करता येते.

प्रिंटींगचा कच्चा माल उत्पादन करणाऱ्या कंपन्या, प्रिटींग मशिनरी, सॉफ्टवेअर्स यामध्ये विशेषतः सेल्स क्षेत्रात खूप संधी असतात, मात्र त्या साठी अनेकजण उत्सुक नसतात असा अनुभव आहे. विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायला हवे, या क्षेत्रात विक्री करायची असल्यास याविषयात तुम्हाला भक्कम टेक्निकल ज्ञान अत्यावश्यक असते. त्या शिवाय यात सेल्स जमूच शकत नाही. सेल्समध्ये प्रवास करावा लागतो, कामाच्या वेळा ठराविक नसतात, पण त्याच वेळी कामाच्या वेळा लवचिक देखील असतात.  

उच्चशिक्षण : बीई प्रिंटिंगनंतर एमएस इन प्रिंटिंगच्या विशेष करून अमेरिकेत अनेक संधी आहेत, तर भारतात देखील आता एमई  प्रिंटींग करता येऊ शकते. परदेशात देखील या क्षेत्रात काम करायला मिळू शकते. कोरोनानंतर झालेल्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून परदेशी नोकरीचे उद्दिष्ट ठेवायला लागेल.  

व्यवसाय : जे बाजारात चालते नेमके तेच शिक्षण अभ्यासक्रमात असणारे प्रिंटिंग इंजिनिअरिंग हे एकमेव असावे, त्यामुळे थोड्या अनुभवाच्या जोरावर यात व्यवसाय सुरू करण्यास अनेक दालने आहेत. मात्र, व्यवसायाचा आवाका वाढवायला बरीच मोठी गुंतवणूक लागते. त्यामुळे व्यवसाय सुरू करून संयमाने वाटचाल करत तो वाढवणे केव्हाही चांगले.

मित्रांनो, या क्षेत्रात अनेक संधी आहेत पण कठोर परिश्रमांना पर्याय नाही. आजही उपलब्ध संधी व योग्य अनुभव असलेले प्रिंटिंग इंजिनिअर्सचे प्रमाण व्यस्त आहे. म्हणजे अनेक ठिकाणी योग्य उमेदवार मिळत नाहीत हा अनुभव आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग बरोबरच, उत्तम आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी आणि मातृभाषेवर प्रभुत्व, कॉम्प्युटर वापराचा सराव, संभाषण कौशल्य यांकडे जरूर लक्ष द्या.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com