लय भारी : पोरीनं पटकावले सगळ्या विषयांत 100 पैकी 100!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जुलै 2020

सीबीएसईचा 12वीचा निकाल मंगळवारी दुपारी लागला. त्यात या मुलीनं सर्व विषयांत मिळून एकूण 600 गुणांपैकी 600 गुण मिळाले आहेत.

लखनऊ : दहावी बारावीच्या मुलांना एक दोन विषयांत 100 पैकी 100 गुण मिळाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकतो वाचतो. पण, सगळ्या विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचं उदाहरण क्वचितच. होय. लखनऊमधल्या एका मुलीनं ही किमया करून दाखवलीय. दिव्यांशी जैन असं त्या मुलीचं नाव आहे. सीबीएसईचा 12वीचा निकाल मंगळवारी दुपारी लागला. त्यात या मुलीनं सर्व विषयांत मिळून एकूण 600 गुणांपैकी 600 गुण मिळाले आहेत. दिव्यांशी जैनचा देशात पहिला क्रमांक आलाय. 

दिव्यांशी लखनौमधील नवयूग रेडिएंस स्कूलची विद्यार्थिनी आहे. देशाभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिव्यांशी या परीक्षेत चांगले गुण मिळवणार, अशी खात्री तिच्या पालकांना आणि नातेवाईकांना होतीच. पण, सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळतील, असं त्यांनाही अपेक्षित नव्हतं. इंग्रजी, संस्कृत, इतिहास, इन्शुरन्स, इकॉनॉमिक्स, भुगोल या विषयांत तिला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

हे वाचा - बारावीनंतर इंजिनिअरिंग करायचे आहे? 'या' शाखेत आहे सुवर्ण संधी

लॉकडाउनमुळं उत्तर प्रदेशातही भुगोलाचा पेपर रद्द झाला होता. परंतु, दिव्यांशीला इतर विषयांत पैकीच्या पैकी गुण असल्यामुळं भुगोलातही तिला 100 गुण देण्यात आले. दिव्यांशीचे वडील राजेश व्यवसायिक असून, आई गृहिणी आहे. दिव्यांशीच्या या यशानंतर तिचं घर असलेल्या गणेशगंज परिसरात, शाळेत आणि सगळ्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. 

इतिहास आवडीचा विषय
दिव्यांशीला इतिहास विषयात प्रचंड रस आहे. मुळात इतिहास विषयाकडे अनेक विद्यार्थी नाक मुरडतात. पण, दिव्यांशीने या विषयात संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. ती इयत्ता चौथीपासून संस्कृत विषयाचा अभ्यास करत आहे. संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता असल्यामुळं तिनं आठवीनंतर हा विषय पुढेही शिकण्याचा निर्णय घेतला. दिव्यांशीनं शाळेतील शिक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच संस्कृत शिकताना, त्यातील सुभाषितं ही आयुष्यात खूप उपयोगी पडत असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचा - पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...' 

इंटरनेटचीही मदत
दिव्यांशी आपल्या यशाचं रहस्य नियोजित अभ्यासाला दिलं. रोज सर्व विषयांना समान वेळ दिल्याचं दिव्यांशीनं सांगितलं. आधीच्या पेपरचे मॉडेल्सचा अभ्यास केला. तसेच पुस्तकातील अभ्यासाबरोबरच इंटरनेटचीही मोठी मदत झाल्याचं दिव्यांशीनं सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cbse 12 th result divyanshi jain get 100 percent