
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहे.
‘आयटीआय’प्रवेशासाठी ११ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार नव्याने उत्तीर्ण झालेले आणि आत्तापर्यंत दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या अशा विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ७) ते रविवार (ता. ११) दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठीचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घोषित केले आहे.
राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश फेरीचेही वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे अद्ययावत प्रवेश वेळापत्रक संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना एसएमएसद्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट द्यावे, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाने नव्याने संलग्नता प्रदान केलेल्या तुकड्यांचा समावेश सद्यःस्थितीत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात आलेला आहे.
उमेदवारांनी आयटीआयनिहाय रिक्त जागांचा तपशील अभ्यासावा, त्याप्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत सहभाग घ्यावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी नमूद केले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक :
तपशील : कालावधी
- नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे, अर्जात दुरुस्ती करणे : ७ ते ११ सप्टेंबर
- संस्थास्तरीय समुपदेशन फेरीतंर्गत सर्व शासकीय व खासगी संस्थांमधील रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे : ११ सप्टेंबर
- समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविणे : १२ सप्टेंबर
- प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी संबंधित आयटीआयमध्ये व्यक्तीश: हजर राहून समुपदेशन फेरीकरिता हजेरी नोंदवावी : १३ ते १७ सप्टेंबर
- संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित संस्थेत त्याचदिवशी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. उमेदवारांनी त्याचदिवशी प्रवेश निश्चित न केल्यास त्या जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल : १३ ते १७ सप्टेंबर
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ:https://admission.dvet.gov.in
आतापर्यंत झालेल्या प्रवेशाची विभागनिहाय आकडेवारी :
विभाग : प्रवेश क्षमता : झालेले प्रवेश : झालेल्या प्रवेशाची टक्केवारी
अमरावती : १८,९१६ : १५,७७५ : ८३.४० टक्के
औरंगाबाद : २०,८८८ : १५,६५४ : ७४.९४ टक्के
मुंबई : २०,२५२ : १५,८५९ : ७८.३१ टक्के
नागपूर : २८,४५६ : १७,९५२ : ६३.०९ टक्के
नाशिक : २९,९१६ : १९,००७ : ६३.५३ टक्के
पुणे : ३१,६८८ : २१,४२५ : ६७.६१ टक्के
एकूण : १,५०,११६ : १,०५,६७२ : ७०.३९ टक्के