esakal | नोकरीची हमी नसल्यामुळे ‘डीएलएड’वर विद्यार्थ्यांची फुली
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

नोकरीची हमी नसल्यामुळे ‘डीएलएड’वर विद्यार्थ्यांची फुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारे ‘डी.एल.एड.’चे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नसणे, शिक्षक भरती प्रक्रियेत होणारी दिरंगाई; तसेच भरती प्रक्रिया राबविली, तर पदभरतीसाठी द्यावे लागणारे पैसे, अशा विविध कारणांमुळे बारावीनंतरच्या ‘डी.एल.एड.’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवार आणि नागरिकांचे म्हणणे आहे.

गेल्या पाच वर्षांत ‘डी. एल. एड’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. हे अधोरेखित करणारे ‘डीएलएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ’ या शीर्षकाखाली बातमी ‘सकाळ’ने रविवारी प्रसिद्ध केली होती.

हेही वाचा: अयोध्येतील जमीन घोटाळ्याची चौकशी का नाही करत? - संजय राऊत

यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह अन्य नागरिकांनाही आपली मते नोंदविण्यासाठी ‘व्हॉटस्‌ॲप’ क्रमांक दिला होता. त्याद्वारे शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डी. एल. एड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ का फिरवत आहेत, याबाबत आपली मते मांडली आहेत. त्यातील काही मते प्रातिनिधिक स्वरूपात दिली आहेत.

काही दशकांपूर्वी बारावीनंतर डी. एड. (आताचे डी.एल.एड) केल्यानंतर लगेच शिक्षक म्हणून नोकरी मिळायची. त्यामुळे मुलांचा शिक्षक होण्याकडे कल वाढला होता. परंतु त्यानंतर डी. एड. करूनही पात्रता परीक्षा आणि अभियोग्यता चाचणी देण्याचे धोरण आले. परंतु नोकरीची हमी उमेदवारांना नसल्याने डी.एल.एड. अभ्यासक्रमाकडे उमेदवार पाठ फिरवत आहेत.

- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

हेही वाचा: मेहकर : जीर्ण टाकी उठली जिवावर, नागरिकांच्या जिवाला धोका

प्रतिक्रिया

शेखर चौधरी : शिक्षकांची नोकरी म्हणजे स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करणे आहे. सुरवातीला शिक्षक सेवक म्हणून कामावर घेतले जाते. दोन वर्षे साधारणतः दरमहा दोन हजार रुपये पगार दिला जातो. त्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळावी म्हणून पाच ते दहा लाख रुपये ‘डोनेशन’ची मागणी केली जाते.

संजय निकाळजे : एकेकाळी ‘डी.एड.’च्या प्रवेशासाठी खूप मोठी स्पर्धा असायची. परंतु आता शिक्षकांचा अनियमितपणे होणारा पगार, रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया, शिक्षण संस्थांमध्ये ‘डोनेशन’ घेऊनच उमेदवारांची नियुक्ती होणे अशा कारणांमुळे नवोदित विद्यार्थी शिक्षक होण्याच्या शिक्षणाकडे पाठ फिरवत आहेत.

संदीप चौधरी : विद्यार्थ्यांनी ‘डीएलएड’ अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे वास्तव असून, याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. शिक्षक भरतीत पारदर्शकता नसल्याने नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना पैसे मोजावे लागत आहेत. अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे येत नाहीत.

डॉ. संदीप अनपट : एकीकडे शिक्षणाचा दर्जा ढासळत आहे तर दुसरीकडे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. पात्रताधारक शिक्षक हे पद भरती होईल आणि आपल्याला कामाची संधी मिळेल, या आशेवर वर्षे वाया घालवत आहेत. पदभरतीमध्ये संधी मिळालीच, तर मोजक्या पदांसाठी लाखो उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते.

धनंजय कुलकर्णी : अनेक वर्षांपासून शिक्षक संच मान्यता प्रक्रियेत बदल होत आहेत. शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’सारखी कुचकामी यंत्रणा तयार केली आहे. शिक्षक सेवानिवृत्त होतात, परंतु नवीन जागा भरल्या जात नाहीत. त्यामुळे या अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेण्यास कोणी तयारी नसल्याचे दिसते.

loading image
go to top