लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने केली कमाल; पहिल्याच प्रयत्नात झाली IAS

टीम ई सकाळ
Tuesday, 5 January 2021

 वडिल राजकारणात असतानाही तिने प्रशासकीय क्षेत्रात जाण्याचं ठरवलं आणि यशही मिळवलं. लेकीच्या या यशामुळे ओम बिर्ला यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची मुलगी अंजली पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली आहे. वडिल राजकारणात असतानाही तिने प्रशासकीय क्षेत्रात जाण्याचं ठरवलं आणि यशही मिळवलं. लेकीच्या या यशामुळे ओम बिर्ला यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अंजली ही ओम प्रकाश बिर्ला आणि डॉक्टर अमिता बिर्ला यांची लहान मुलगी आहे. युपीएससीने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये अंजलीचे नाव आहे. युपीएससीमध्ये मिळालेल्या यशानंतर तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळालेल्या अंजलीने सांगितलं की, कोटामधील सोफिया स्कूलमधून कला शाखेतून 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर रामजस कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची पदवी घेतली. पुढे एक वर्ष दिल्लीत राहून युपीएससीची तयारी केली. 

हे वाचा - UPSC Mains 2020: मुख्य परीक्षा आणि अॅडमिट कार्डबाबत सर्व माहिती एका क्लिकवर!

विशेष म्हणजे अंजलीने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. बहीण आकांक्षाला आपल्या या यशाचं श्रेय तिने दिलं आहे. अंजलीने सांगितलं की, युपीएससीची तयारी करत असताना मोठ्या बहिणीने प्रेरणा दिली. ती फक्त प्रोत्साहन देत होती असं नाही तर अभ्यास आणि परीक्षा यासह मुलाखतीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये तिने मोलाची मदत केली. यावेळी आई अमिता आणि बाबा ओम बिर्ला यांनीही स्वत:वर विश्वास ठेवण्यास सांगितलं. 

अंजली म्हणाली की, परीक्षेची तयारी ती करत होती मात्र संपूर्ण कुटुंब तिला मदत करत होती. कोटामध्ये सर्वसामान्यपणे बायोलॉजी किंवा मॅथ्स घेण्यासाठी सांगितलं जातं. या दोन्ही विषयांमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पण इतर विषयांमध्येही खूप काही आहे आणि ते शोधण्यासाठी प्रेरणा दता येईल असं म्हटलं आहे.

Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज​

परीक्षेची तयारी करण्यासाठी 10 ते 12 तास अभ्यास केला. परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय निवडले होते. कुटुंबात राजकीय वातावरण असल्यानं प्रशासकीय क्षेत्रात जाण्याच्या निर्णयाबाबत विचारलं असता अंजलीने म्हटलं की, वडिल राजकारणी आहेत तर आई डॉक्टर. कुटुंबातील इतर सदस्यदेखील कोणत्या ना कोणत्या समाजकार्यात आहेत. यामुळेच मी युपीएससी करण्याचा निर्णय घेतला.

अंजलीने सांगितलं की, ती कोणत्याही विभागात काम करण्यासाठी तयार आहे. मात्र निवडायचं झालं तर महिला सशक्तीकरणासाठी काम करण्याची संधी मिळाली तर आनंद होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha speaker om birla s daughter crack upsc exam