खेलेगा इंडिया... : खेळाडूंची कामगिरी सुधारणारे घटक

प्रशिक्षणाचे आणि मार्गदर्शनाचे वेगवेगळे घटक समजून घेणे प्रशिक्षकासाठी आवश्यक आहे. प्रशिक्षकांनी प्रथमोपचार आणि दुखापतीपासून बचाव करण्याविषयी आवश्यक ज्ञान मिळवले पाहिजे.
Player
Playersakal
Summary

प्रशिक्षणाचे आणि मार्गदर्शनाचे वेगवेगळे घटक समजून घेणे प्रशिक्षकासाठी आवश्यक आहे. प्रशिक्षकांनी प्रथमोपचार आणि दुखापतीपासून बचाव करण्याविषयी आवश्यक ज्ञान मिळवले पाहिजे.

- महेंद्र गोखले

प्रशिक्षणाचे आणि मार्गदर्शनाचे वेगवेगळे घटक समजून घेणे प्रशिक्षकासाठी आवश्यक आहे. प्रशिक्षकांनी प्रथमोपचार आणि दुखापतीपासून बचाव करण्याविषयी आवश्यक ज्ञान मिळवले पाहिजे. प्रशिक्षक त्याच्या क्रीडापटूंना क्रीडा कौशल्ये शिकवतो, तेव्हा खेळाडूंनी उत्कृष्ट ॲथलेटिक कामगिरी करण्यासाठी शारीरिक हालचालींचे अचूक तंत्र आत्मसात केले पाहिजे. अशा हालचाली, वेग वाढवताना, कमी करताना किंवा दिशा बदलताना ॲथलिट्सच्या स्नायूंवर पडलेल्या ताणांमुळे दुखापतीचा धोका वाढवतात. खेळाडूंच्या कामगिरीच्या अपेक्षांमुळे त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक दबाव निर्माण होतो आणि असा दबाव दुखापतींचा धोका वाढवतात. खेळाच्या कोणत्याही स्तरावर स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण पद्धती आखताना प्रशिक्षकाला या संभाव्य धोक्यांची जाणीव असणे आवश्यक आहे.

संवाद

प्रभावी प्रशिक्षक होण्यासाठी प्रशिक्षकानी त्याच्या खेळाडूंशी प्रभावीपणे संवाद साधणे आवश्यक आहे. यशस्वी प्रशिक्षक होण्यासाठी आणि अभिजात खेळाडूंचा विकास करण्यासाठी संवाद साधण्याची क्षमता महत्त्वाचे कौशल्य आहे. खेळाडूंनी खेळाच्या मैदानात आणि मैदानाबाहेर एकमेकांशी संवाद कसा साधावा हे शिकले पाहिजे- जेणेकरून त्यांच्या यशाची वाटचाल सुलभ होईल. अनेक वेळा प्रशिक्षक खेळाच्या तांत्रिक कौशल्यांमध्ये अत्यंत जाणकार असतो आणि त्याच्याकडे एका परिपूर्ण खेळाची योजनाही असते; परंतु ही माहिती तो त्याच्या संघातील खेळाडूंपर्यंत प्रभावीरीत्या पोचवू शकला नाही, तर त्याच्या संघाच्या विजयाची शक्यता खूपच कमी होते. खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच्या खेळाबद्दल एकच भाषा बोलत असले पाहिजे, एकाचे बोलणे दुसऱ्याला अचूक कळले पाहिजे, अशा प्रकारचा संवाद निर्माण करण्याचे काम एक प्रभावी संवाद कौशल्य असणारा प्रशिक्षकच करू शकतो.

योग्य पोषक आहार

प्रशिक्षकानी खेळाडूंशी सकारात्मक संबंध प्रस्थापित केल्यामुळे, अनेक खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शारीरिक प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व कळू लागते. म्हणून, प्रत्येक प्रशिक्षकाने सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रोग्राम विकसित करताना कामगिरी उंचावणे या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. तथापि, योग्य पोषक आहाराशिवाय, दुखापतीतून बाहेर पडायला वेळ लागणे आणि कमी झालेल्या एनर्जीमुळे कामगिरी करण्याची क्षमता कमी होणे असे परिणाम दिसू शकतात. म्हणून, योग्य पोषक आहार कामगिरी उंचावण्यासाठीचा पाया आहे. योग्य आणि आवश्यक पोषक आहाराशिवाय, खेळाडू त्यांच्या पूर्ण क्षमतेने स्पर्धेत उतरू शकत नाहीत.

क्रीडापटूंच्या योग्य पोषक आहाराच्या गरजांची चर्चा करताना कामगिरी वाढवणाऱ्या पूरक आहारांचाही विचार करणे आवश्यक आहे. खेळाडूंना तो आहार सुचवण्यापूर्वी प्रशिक्षकाला त्या उत्पादनांबद्दल योग्य ती माहिती असणे आवश्यक आहे. पोषक आहाराबाबतचे अनेक लेख प्रकाशित आहेत आणि ते इंटरनेटवर विनामूल्य मिळू शकतात. एकूण कामगिरीवर अनेक घटकांचा परिणाम होऊ शकतो; तथापि, प्रशिक्षणाबरोबरच योग्य पोषक आहारासारख्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केल्याने, कामगिरीमध्ये अधिक सुधारणा होऊ शकते.

ध्येय निश्चिती

खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करण्याची जबाबदारी प्रशिक्षकाची असते. अशा प्रकारे, अनेक ऍथलीट्सच्या मनामध्ये यशस्वी कामगिरी करण्याबरोबरच त्यात प्रभुत्व मिळविण्याची इच्छा निर्माण होते. उदाहरणार्थ, एखादा खेळाडू केवळ स्पर्धा जिंकू इच्छित नाही तर त्याबरोबरच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी त्याने आत्मसात केलेल्या क्रीडाकौशल्यांचे अत्युत्तम सादरीकरण करण्याची इच्छा देखील बाळगू शकतो. अर्थातच, प्रशिक्षकांना खेळाडूंची कामगिरी वाढवण्यास मदत करण्याची संधी मिळते.

क्रीडा स्पर्धेतील यश हे खेळाडूच्या कौशल्य आणि प्रेरणा यावर अवलंबून असते. त्यामुळे, प्रशिक्षकांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की त्याने त्याच्या खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रवृत्त करावे. माझ्या मते प्रेरणा ही व्यक्तीच्या प्रयत्नांची दिशा आणि तीव्रता दर्शवते.

खेळाडू-प्रशिक्षक यामधले सकारात्मक संबंध विकसित होत असताना, अनेक खेळाडू त्यांच्या प्रशिक्षकाला आदर्श मानू लागतात. म्हणून, प्रशिक्षकानी खेळाडूंची वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खेळाडूंशी संवाद साधला पाहिजे. अॅथलीटच्या वैयक्तिक उद्दिष्टांमुळे कौशल्य विकास आणि उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते. एक व्यावसायिक म्हणून देखील प्रशिक्षकाने खेळाडूला त्याच्या क्रीडाकौशल्यांबद्दल, सुरक्षिततेबद्दल, योग्य पोषक आहाराबद्दल आणि दुखापतींपासून बचाव करण्याबद्दल योग्य आणि खरा अभिप्राय दिला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com