जुळ्या बहिणींची कमाल! सर्व विषयात मिळवले सेम टू सेम गुण

सूरज यादव
बुधवार, 15 जुलै 2020

मानसी आणि मान्या नावाच्या दोन जुळ्या बहिणींनी तर कमालच केली आहे. या मुलींनी सीबीएसई बोर्डात प्रत्येक विषयात एकसारखेच गुण मिळवले आहेत.

नवी दिल्ली  - सीबीएसईच्या निकालात अनेक आश्चर्यकारक असे निकाल समोर आले आहेत. दिव्यांशी जैन नावाच्या मुलीने सर्वच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून इतिहास घडवला आहे. आता ग्रेटर नोएडातील मानसी आणि मान्या नावाच्या दोन जुळ्या बहिणींनी तर कमालच केली आहे. 3 मार्च 2003 ला फक्त 9 मिनिटांच्या अंतराने जन्माला आलेल्या या मुलींनी सीबीएसई बोर्डात प्रत्येक विषयात एकसारखेच गुण मिळवले आहेत. जुळ्या बहिणी दिसायला एकसारख्या असून त्यांच्या आवडीनिवडीसुद्दा एकसारख्याच आहेत. मात्र सोमवारी लागलेल्या निकालाने पुन्हा एकदा दोघींची चर्चा रंगली आहे. त्यांच्या निकालाने आई वडील, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणीसुद्दा चकीत झाल्या आहेत.

ग्रेटर नोएडातील वेस्टमध्ये राहणाऱ्या सुचेतन राज सिंग यांच्या मानसी आणि मान्या या दोन जुळ्या मुली आहेत. एस्टर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनी असलेल्या या दोघींना सीबीएसईमध्ये 12वीला 95.8 टक्के गुण मिळाले आहेत. मानसी आणि मान्या यांना इंग्रजीत 98, भौतिकशास्त्र - 95, रसायनशास्त्र - 95 कॉम्प्युटर सायन्स - 98 आणि फिजिकल एज्युकेशनमध्ये 95 गुण मिळाले आहेत. 

मानसीने निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही दोघींनी एकत्रच अभ्यास केला. अभ्यासात काही अडचणी असतील तर एकमेकींची मदत घेतली. आमच्यासाठी हे सरप्राइज आहे. चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती मात्र एकसारखे गुण तेसुद्धा सर्व विषयात याची कल्पनाही नव्हती केली. हा फक्त योगायोग आहे असंही मानसी म्हणाली. 

हे वाचा - मार्कांपेक्षा आयुष्य मोठं! केमिस्ट्रीला 24 गुण मिळालेल्या IAS अधिकाऱ्याचं मार्कलिस्ट पाहा

इयत्ता नववीपासून मानसी आणि मान्या एस्टर पब्लिक स्कूलमध्ये शिकतात. दोघींनाही इंजिनिअर व्हायचं आहे. खेळामध्येही मानसी आणि मान्या यांना बॅडमिंटन खेळायला आवडतं. त्यांच्या शाळेच्या प्राचार्यांनी सांगितलं की, मानसी आणि  मान्या यांना पाहून आम्ही कन्फ्युज व्हायचो. ज्यावेळी त्यांचे गुण पाहिले तेव्हा आम्हीही चकीत झालो होतो. आम्हालाही विश्वास बसला नाही की त्यांना सर्व विषयात एकसारखेच गुण मिळाले. 

हे वाचा - बारावीनंतर इंजिनिअरींगमध्ये कोणत्या आहेत संधी? जाणुन घ्या

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आयसीएसईच्या 10 वीच्या निकालातही असाच प्रकार घडला होता. गुरुग्राममधील जुळ्या बहिण भावाचे गुण एकसारखे होते. आदित्य मिश्रा आणि आनंदिता मिश्रा यांना आयसीएसईच्या परीक्षेत 99.20 टक्के गुण मिळवले होते. तेव्हाही सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mansi and manya twins get same marks in all subject in 12th cbse result