esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण भरताना तांत्रिक अडचणींचा डोंगर
sakal

बोलून बातमी शोधा

hsc board

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण भरताना तांत्रिक अडचणींचा डोंगर

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून २०२१ च्या इयत्ता बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे ९२ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनातील गुण संगणकीय प्रणालीत भरताना सलग दोन दिवस सातत्याने सर्व्हर डाऊन होत असून, इंटरनेट यंत्रणा आणि वीज पुरवठा विस्कळित होत आहे. परिणामी शिक्षकांना गुण भरताना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी बारावीच्या निकालाच्या कामकाजातील उर्वरित काम हे वेळेत पूर्ण होणार का!, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (mountain technical difficulties in filling marks of 12th standard students)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये होणारी बारावीची परीक्षा रद्द केली आहे. तर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल दिले जातील, असे जाहीर केले आहे. हे निकाल तयार करण्यासाठी राज्य मंडळाने शिक्षकांना संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीत कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत राज्य मंडळाने दिलेल्या कार्यपद्धतीनुसार अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बारावीचा निकाल राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाने बारावीच्या निकालासाठीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी महाविद्यालयांना शुक्रवारपर्यंतची (ता.२३) मुदत दिली आहे. मात्र, संगणकीय प्रणालीत माहिती भरताना येणाऱ्या अडचणींचा डोंगर पाहता यात मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. याबाबत राज्य मंडळाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याने शिक्षक पेचात सापडले आहेत.

संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांना केले हैराण

‘‘गेल्या दोन दिवसांपासून मंडळाची संगणकीय प्रणाली सातत्याने खंडित होत आहे. गुरुवारी देखील या प्रणालीवरील कामकाज संथगतीने होत होते. बारावीचे गुण अपलोड करण्यासाठी असणारी संगणकीय प्रणाली खंडित होण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी," अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली.

हेही वाचा: 'गारवा' हॉटेल मालकाची हत्येची 'सुपारी'; कटाचा उलगडा

बारावीच्याही काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित राहण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, ‘‘बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती अपलोड करताना सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्याचे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही १० टक्के काम अपूर्ण असून एका दिवसाच्या मुदतीत पूर्ण होणे अशक्य आहे. दरम्यान संगणकीय प्रणालीत येणाऱ्या अडचणींमुळे दहावीप्रमाणेच बारावीच्याही काही विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.’’

हेही वाचा: पूरस्थितीमुळं कोकण रेल्वे विस्कळीत; ६,००० प्रवाशी अडकले!

मूल्यांकन भरण्यासाठी हवी मुदतवाढ

‘‘संगणकीय प्रणाली सातत्याने बंद पडत असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्याशिवाय मुंबई परिसरातील मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, पालघर, नालासोपारा येथून येणाऱ्या शिक्षकांना महाविद्यालयांमध्ये पोचणे अशक्य होत आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण संगणकीय प्रणालीत भरण्यासाठी राज्य मंडळाने किमान दोन दिवसांची मुदतवाढ देणे गरजेचे आहे," असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

बारावीच्या निकालाचे ९२ टक्के कामकाज पूर्ण

तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितल्यानुसार, ‘‘कनिष्ठ महाविद्यालयांकडून बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण संगणकीय प्रणालीत भरण्याचे काम सुरू आहे. बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ९२ टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. राज्यात केवळ मुंबईमध्ये पावसामुळे काही ठिकाणी अडचणी येत होत्या. त्यामुळे संगणकीय प्रणालीत गुण भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची, मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. परंतु दिलेल्या मुदतीत उर्वरित काम पूर्ण होईल.’’

loading image