esakal | वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०’ ही परीक्षा शनिवारी दिली. सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब), राज्य कर निरीक्षक (गट-ब) आणि पोलिस उप निरीक्षक (गट-ब) या पदांसाठी तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उमेदवारांनी ही पूर्व परीक्षा दिली. परंतु या परीक्षेसाठी हजारो उमेदवारांनी दांडी मारल्याचेही निदर्शनास आले आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०२० मध्ये घेण्यात येणारी ही पूर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ही परीक्षा शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास साडे तीन लाखांहुन अधिक उमेदवारांनी अर्ज केला होता. परीक्षेपूर्वी दीड तास अगोदर उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रावर येण्याबाबत पूर्व सूचना देण्यात आली होती. त्याप्रमाणे सकाळी नऊ वाजल्यापासून उमेदवारांनी आपल्या परीक्षा उपकेंद्रावर गर्दी करण्यास सुरवात केली. दरम्यान प्रवेशद्वाराबाहेर उमेदवारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

हेही वाचा: नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमांची चलती !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारातच उमेदवारांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. त्यानंतर सुरक्षित अंतर पाळत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता, असा अनुभव उमेदवारांनी सांगितला आहे. दरम्यान, परीक्षेपूर्वी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांनी मोठ्या शहरातून परीक्षा देण्याऐवजी आपल्या गाव, तालुका या जवळील केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून आले. तर हजारो उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारल्याचे चित्र आहे. दरम्यान सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

तब्बल दोन वर्षांपासून तयारी करत असलेली परीक्षा झाल्याचे समाधान

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाच वर्षांपूर्वी बारामतीहून पुण्यात आलेल्या सागर ठोंबरे म्हणाले,‘‘तब्बल दोन वर्षांनंतरही परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे. या परीक्षेसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे. त्यामुळे खूप समाधानी आहेत.’’

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

पुणे जिल्ह्यातून साधारणत: ४२ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. परंतु प्रत्यक्ष परीक्षेला जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्यातील १०९ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ११ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील सात हजार ५४० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. या परीक्षेत ३ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. जिल्ह्यातील ३५ परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी ११३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

loading image
go to top