
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी महिला उमेदवारांना 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधीय.
NDA, NA मध्ये फक्त 400 जागा; महिला उमेदवारांची संख्या वाढणार?
NDA Recruitment 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी महिला उमेदवारांना 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधीय. आतापर्यंत या परीक्षेला फक्त पुरुषांनाच परवानगी होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या परीक्षेला महिला उमेदवारांना बसण्यासाठी प्रवेशद्वार खुले करण्यात आलेय. यूपीएससीनं 24 सप्टेंबर रोजी या परीक्षेला बसणाऱ्या महिला उमेदवारांशी संबंधित एक नोटीस जारी केली होती आणि त्यांच्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया त्या दिवसापासूनच सुरू करण्यात आली. या परीक्षेची अधिसूचना प्रथम 9 जून रोजी जारी करण्यात आली आणि पुरुष उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 ते 29 जून पर्यंत चालली होती.
एकूण किती जागांसाठी परीक्षा होणार?
NDA आणि NA (II) परीक्षेसाठी 9 जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही परीक्षा एकूण 400 जागांसाठी होणार आहे. या 400 जागांपैकी 370 जागा एनडीएसाठी आणि 30 जागा एनएसाठी आहेत. तर एनडीएच्या 370 जागांपैकी 208 जागा लष्कराच्या, 42 जागा नौदलाच्या आणि 120 जागा हवाई दलाच्या असणार आहेत.
महिला उमेदवारांच्या जागांच्या संख्येत वाढ होईल?
या परीक्षेला 400 पदांसाठी सरासरी 4 लाख उमेदवार अर्ज करत असतात. अशा स्थितीत, उमेदवारांच्या मनात महिला उमेदवारांसाठी अतिरिक्त पदे जोडली जातील, की त्याच पदांसाठी परीक्षा असेल, याबाबत साशंकता निर्माण होणं साहजिक आहे. यूपीएससीनं महिला उमेदवारांसाठी जारी केलेल्या नोटिसीत नमूद केलंय की, त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांच्या संख्येची माहिती भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर जाहीर केली जाईल. त्यामुळे पदांची संख्या वाढेल की नाही, याची माहिती तेव्हाच समजणार आहे.
NDA आणि NA (II) 2021 परीक्षा कधी होणार?
ही परीक्षा वर्षातून दोनदा UPSC द्वारे घेतली जाते आणि 2021 च्या दुसऱ्या सत्र परीक्षेसाठी UPSC नं 9 जून रोजी अधिसूचना जारी केली. अधिकृत अधिसूचनेनुसार, ही परीक्षा 5 सप्टेंबरला होणार होती. पण, आयोगानं त्याची तारीख वाढवली असून ती आता 14 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे.