रिस्किलिंग : गरज तज्ज्ञ कामगारांची...

विनोद बिडवाईक
Wednesday, 7 April 2021

संस्थेमध्ये तीन प्रकारचे रोल्स आणि कर्मचारी काम करत असतात...

संस्थेमध्ये तीन प्रकारचे रोल्स आणि कर्मचारी काम करत असतात,
१) एखाद्या विषयातील तज्ज्ञ कर्मचारी : प्रत्येक विभागामध्ये हे कर्मचारी असतात. ते त्या-त्या विषयांचे तज्ज्ञ असतात, पण हे कर्मचारी आपल्या कामामध्ये कुशलही असतात. तंत्रज्ञ, एखादे सॉफ्टवेअर समजणारे, हाताळणारे प्रोग्रॅमर, व्यवस्थापनातील काही विषय जसे रणनीती ठरवणारे, विश्लेषक, वैज्ञानिक, मानव संसाधन सांभाळणारे वगैरे सारखे कर्मचारी या प्रकारात येतात.

२) व्यापक काम करणारे कर्मचारी : जे काम करण्यासाठी फारसे कौशल्य लागत नाहीत, पंधरा ते एक महिन्यात जे काम शिकवता येते आणि करता येते अशी बरीच कामे या प्रकारात येतात. ही कामे सहजासहजी शिकता येतात आणि या कामासाठी फारशा शिक्षणाची गरज पडत नाही. उदा. कामगार, प्रशासन सांभाळणारे, ट्रॅव्हल बुकिंग करणारे, कामगार अथवा कर्मचारी भरती करणारे, हिशेब तपासनीस, समन्वयक, विक्रेते, वार्ताहर वगैरे.

३) नेतृत्वगुण आवश्यक असणारे रोल्स : या प्रकारात, एखादा विभाग, छोटी-मोठी टीम, प्रकल्प, अथवा उपक्रम सांभाळणारे कर्मचारी असतात. काही कर्मचारी एकटे काम करत असले तरी त्यांच्याकडे आदर्श नेतृत्व म्हणून बघितले जाते.

हेही वाचा - इंडियन नेव्ही जॉब्स : 710 ट्रेड्‌समन भरती परीक्षा ऍडमिट कार्ड जाहीर ! ही घ्या थेट लिंक

बऱ्याचदा आपण स्वतःला तज्ज्ञ समजतो, परंतु त्या रोलसाठी आवश्यक असणारे कौशल्य मात्र शिकून घेत नाही. अकाउंट विभागात काम करणारा कर्मचारी स्वतःला अकाउंटचा तज्ज्ञ समजतो, परंतु तसे नसते. कोणत्याही वेळेस या विभागांमध्ये ऑटोमोशन झाल्यास सर्वप्रथम या रोलवर गदा येते. एखादा कनिष्ठ कर्मचारी ते काम करू लागला, की तुमचे महत्त्व कमी होते. मुळातच सतत न शिकल्यामुळे कोणीतरी नवीन कर्मचारी येऊन तुम्हाला हद्दपार करू शकतो. त्यामुळे सर्व प्रथम स्वतःला असा प्रश्न विचारणे गरजेचे आहे, की आपण खरंच तज्ज्ञ आहोत का? आपला जॉब, नोकरी किंवा आपला हा रोल थोडे प्रशिक्षण देऊन कोणीही करत असेल तर आपला जॉब हा सुरक्षित नक्कीच नाही. काही रोल्स/जॉब्स नॉलेज बेस्ड (ज्ञानाधारित) असतात. उदा. पत्रकार, वकील, डॉक्टर, वैज्ञानिक, प्रशिक्षक, संस्थेत एक्सलन्सवर काम करणारे कर्मचारी, संगणकाला अथवा रोबोटला सूचना देणारे, त्यांचे प्रोग्रामिंग करण्याचे काम करणारे कर्मचारी इत्यादी. हे तज्ज्ञ मंडळीमध्ये येतात. परंतु एखाद्या मशिनचा मेंटेनेस करणारा व्यक्ती हा तज्ज्ञ असेलच असे नव्हे किंवा प्रॉडक्शन सुपरवायझर म्हणून काम करणारा कर्मचारी तज्ज्ञ असेलच असे नव्हे. त्यामुळे सर्वप्रथम आपला जॉब स्वतः समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. नेतृत्व आवश्यक असणारे जॉब हा वेगळाच प्रकार आहे. खूपदा तुम्ही वैयक्तिक सहयोगी/एकटेच असू शकता, परंतु तुम्हाला इतर कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यावे लागते. अशा वेळेस तुमच्या नेतृत्वगुणांचा कस लागतो. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन कोणते जॉब उपलब्ध आहेत, सतत आपण रोजगारक्षम कसे राहू याचा आढावा घेणे नेहमीच फायद्याचे ठरते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reskilling skilled workers are required in institution for accurate work done