esakal | विद्यापीठे व महाविद्यालयांच्या आगामी परीक्षा व प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची होतेय तयारी

बोलून बातमी शोधा

Exam
विद्यापीठे व महाविद्यालयांच्या आगामी परीक्षा व प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची होतेय तयारी
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : देशातील कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता विद्यापीठे व महाविद्यालये प्रस्तावित सर्व परीक्षा व प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची तयारी करीत आहेत. लवकरच यूजीसी यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करेल. यासह अभ्यासक्रम देखील कमी केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त देशातील विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने कोरोनामुळे त्रस्त असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी बऱ्याच राज्यांच्या परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आणि बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली.

उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम असतील ऑनलाइन; यूजीसीने सुरू केले "या' योजनेचे काम

उच्च शिक्षण संस्थांनी त्यांचे जास्तीत जास्त अभ्यासक्रम ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून घेण्याचे ठरविले आहे. तथापि, ही सुविधा केवळ उच्च शिक्षण संस्थांनाच उपलब्ध असेल. या सुविधेचा विस्तार वाढल्यामुळे प्रवेश नाकारला गेल्यानंतरही विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषय आणि अभ्यासक्रमात शिकू शकतील, असा विश्वास आहे.

हेही वाचा: सीए फाउंडेशन परीक्षार्थींना दिलासा ! बारावी ऍडमिट कार्ड, ऑनलाइन फॉर्मसाठी जरुरी नाही अटेस्टेड

योजनेवर सुरू आहे वेगात काम

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी या योजनेवर वेगवान काम सुरू केले आहे. दरम्यान, एआयसीटीईनेही ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाद्वारे मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम शिकवण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय), कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, डाटा सायन्स, लॉजिस्टिक्‍स, ट्रॅव्हल ऍड टुरिजम यासह प्रबंधन व संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

यूजीसीने सुरू केले लसीकरण संबंधित रणनीतीवर काम

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) लसीकरणाच्या धोरणावर काम सुरू केले आहे. विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांनाही आपापल्या स्तरावर योजना तयार करण्यास सांगितले आहे. यूजीसी सचिव रजनीश जैन यांच्या म्हणण्यानुसार, सुरवातीच्या टप्प्यात सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना संस्थेतील सर्व लोकांना लसीकरण करून घेण्यास सांगण्यात आले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 20 एप्रिल 2021 रोजी यूजीसी नेटची परीक्षा, डिसेंबर 2020 ची परीक्षा स्थगित केल्या. आयआयटी मद्रास आणि अण्णा विद्यापीठाने त्यांच्या सेमिस्टर परीक्षा तसेच ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाने (आयसीएआय) कोव्हिड -19 च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित सीए अंतिम आणि सीए इंटरमिजिएट परीक्षा मे मध्ये तहकूब केल्या. आयसीएआयने प्रसिद्ध केलेल्या महत्त्वपूर्ण माहितीत असे म्हटले आहे, की कोव्हिड -19 च्या सध्याच्या समस्येपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे 21 मे ची सीए अंतिम आणि 22 मेची सीए इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.