esakal | परीक्षेतील यशासाठी योग्य अभ्यासपद्धती
sakal

बोलून बातमी शोधा

study

दहावी-बारावीच्या परीक्षांना आता खूपच कमी कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक विद्यार्थी भरपूर गुण मिळवण्यासाठी काय करायचे याच मानसिक विवंचनेतून जात आहे.

परीक्षेतील यशासाठी योग्य अभ्यासपद्धती

sakal_logo
By
Team eSakal

दहावी-बारावीच्या परीक्षांना आता खूपच कमी कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक विद्यार्थी भरपूर गुण मिळवण्यासाठी काय करायचे याच मानसिक विवंचनेतून जात आहे. आज मी तुम्हाला यावरील सोपा उपाय सांगणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे, की जे विद्यार्थी हा उपाय अमलात आणतील त्यांचे बोर्ड परीक्षेतील गुण त्यांच्या अपेक्षेपेक्षा भरपूर वाढतील.

विद्यार्थी मित्रांनो, मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की तुमचे हे संपूर्ण वर्ष ऑनलाइन शिकण्यामध्येच गेलेले आहे. ऑनलाइनमध्ये तुम्ही कसे शिकलात, तुम्हाला त्यामध्ये किती अडचणी आल्या, शिकवलेला पूर्ण भाग हा समजला आहे किंवा नाही, स्वअभ्यासावर तुम्ही किती भर दिला, तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे किंवा नाही, या आणि अशा अनेक अडचणींना तुम्ही सामोरे गेला आहात. परंतु, दहावी-बारावीच्या परीक्षेतील गुणांचे महत्त्व लक्षात घेता या अडचणी आपण कायमच सांगू शकणार नाही. साधा विचार करा, की अजून दहा-बारा वर्षांनी नोकरीच्या निमित्ताने मुलाखत देताना माझ्या बोर्ड परीक्षेच्या वेळेला कोरोना प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला मार्क कमी मिळाले असे तुम्ही सांगू शकणार नाही. म्हणूनच मी सांगितलेले अभ्यासपद्धती मधील बदल तुम्हाला या शेवटच्या थोड्या दिवसांमध्ये करणे आवश्यक आहे.

हे वाचा - बारावीच्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचंय? मग जाणून घ्या सविस्तर

वाचन पाठ्यपुस्तकाचे
संपूर्ण वर्षभर ऑनलाइन शिकताना आणि प्रत्यक्ष अभ्यास करताना सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास प्रक्रियेतील फक्त वाचन आणि पाठांतर या दोन भागांवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पाठ्यपुस्तकाचे वारंवार वाचन हे कदाचित प्रत्येकाकडून झाले असेलही आणि ते खूप महत्त्वाचेही आहे. एखाद्या विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकाच्या वाचनावर कमी भर दिला असेल, तर त्याने अजूनही पाठ्यपुस्तकाचे एकदा किंवा दोनदा जमेल तेवढे आणि जसा वेळ उपलब्ध आहे त्याप्रमाणे वाचन नक्की करावे. पाठ्यपुस्तकाच्या अधिक वाचनाने आपण जी उत्तरे लिहितो त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील भाषा अधिकाधिक येते आणि उत्तरांमध्ये सर्व मुद्दे समाविष्ट होतात. त्यामुळे परीक्षकाला एकही गुण कापण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच पाठ्यपुस्तकाच्या वाचनावर तुम्ही लक्ष अजूनही केंद्रित करू शकता.

केवळ पाठांतर धोकादायक
अत्यंत हुशार विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकाच्या वाचनाच्या सरावानंतर स्वतःचे उत्तर तयार करून लिहू शकतो, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थी हे बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तयार नोट्स किंवा गाईड्स यावरून जसे दिले आहे तसे उत्तर पाठ करून लिहितात. संपूर्ण उत्तर हे जसे दिले आहे तसे १००% पाठ करणे व लिहिणे हे धोक्याचे असते. कारण त्या उत्तरातील एखादा शब्द किंवा एखादा मुद्दा हा आठवला नाही, तरी गाडी पुढे सरकत नाही. त्यामुळे पुढील उत्तर आठवत नाही व लिहिता येत नाही. म्हणूनच संपूर्ण उत्तर पाठ करण्याऐवजी उत्तरातील महत्त्वाचे मुद्दे किंवा की-वर्ड्स पाठ केले, तरी परीक्षेत उत्तर लिहिताना त्या महत्त्वाच्या शब्दांचे स्पष्टीकरण आयत्या वेळेस आपल्या भाषेत लिहिता येते. त्यामुळे उत्तराचा काही भाग लिहिताच आला नाही किंवा पूर्णपणे विसरला अशी तक्रार करायला संधी मिळणार नाही. म्हणूनच मित्रांनो, पाठांतर ही महत्त्वाची प्रक्रिया असली तरी संपूर्ण उत्तर समजून न घेता पाठ करणे हे धोक्याचे आहे. त्याकरिताच पाठ्यपुस्तकातील उत्तराच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करून ठेवा आणि त्या मुद्द्यांचे वारंवार वाचन आणि पाठांतर करा. त्यामुळे परीक्षेमध्ये तुमचा एकही मुद्दा उत्तर लिहिताना विसरला जाणार नाही आणि भरपूर गुण मिळतील.

टेस्ट सिरिज उपलब्ध
अभ्यासाच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये नक्की कोणते मटेरिअल वापरावे, जेणेकरून कमी वेळामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांचा नेमका अभ्यास होईल याची काळजी सर्वच विद्यार्थी व पालकांना आहे. त्यावरील एक अनुभवसिद्ध उपाय म्हणून ‘सकाळ’ व ‘टाकळकर क्लासेस’ यांच्या एकत्रित प्रयत्नातून दहावीच्या एसएससी, सीबीएससी, आणि आयसीएसईच्या, तसेच बारावी आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सर्व विषयांच्या प्रत्येकी तीन किंवा चार प्रश्नपत्रिका नमुना उत्तरांसहित आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या अंतिम तयारीमध्ये प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा प्राधान्याने अभ्यास केल्यास उत्तम यश मिळेल.

अभ्यासाच्या प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे लेखनाचा सराव. जास्तीत जास्त विद्यार्थी याच पायरीवरच चुकतात आणि आम्ही खूप तास अभ्यास करतो तरीही मार्क वाढत नाहीत अशी तक्रार करतात. म्हणूनच लेखनाचे महत्त्व आणि मिळणारे यश यांचा असलेला संबंध याबद्दलची माहिती पुढील लेखात.
(पूर्वार्ध)

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि करिअर कौन्सिलर आहेत.)

loading image